मुंबई : सासरच्या घरातून स्वत:हून निघून गेलेल्या आणि त्याच कारणावरून रीतसर घटस्फोटही झालेल्या पत्नीला कालांतराने विपन्नावस्था आली तर तिच्या उदरनिर्वाहासाठी काही ठरावीक रक्कम उचलून देण्याची जबाबदारी पती झटकू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.कुटुंब न्यायालयाकडून घटस्फोटाच्या वेळी दिली जाणारी पोटगी आणि विपन्नावस्थेत असलेल्या पत्नीला दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अन्वये पतीकडून मिळणारी पोटगी हे कायद्याने स्त्रीला दिलेले दोन स्वतंत्र हक्क आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या वेळी पतीकडून पोटगीपोटी एकरकमी रक्कम आधी मिळाली असली तरी नंतर ती कलम १२५ अन्वये वेगळी पोटगी मागू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.अशाच एका पत्नीला न्याय दंडाधिकाऱ्यांनी कलम १२५ अन्वये पोटगी नामंजूर केल्यानंतर तिने सत्र न्यायालयात दाद मागितली होती व त्या न्यायालयाने तिला दरमहा १ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध पतीने केलेले अपील फेटाळताना न्या. एम.एस. सोनक यांनी अलीकडेच वरीलप्रमाणे निकाल दिला. (विशेष प्रतिनिधी)पतीने मांडलेले मुद्दे1पत्नी स्वत:हून घर सोडून निघून गेली व त्यानंतर ११ वर्षे ती वेगळी राहत होती.2याच कारणावरून न्यायालयाने तिच्यापासून आपल्याला घटस्फोट दिला होता.3 घटस्फोटाच्या वेळी न्यायालयाने तिला दरमहा ४५० रुपये पोटगी मंजूर केली. परंतु नंतर आमच्या दोघांमध्ये सहमती झाली व दरमहा पोटगीऐवजी एकरकमी ६५ हजार रुपये तिने स्वीकारले. एवढेच नव्हे, तर एकदा ही रक्कम मिळाल्यावर भविष्यात कसलीही मागणी न करण्याचेही त्या वेळी तिने कबूल केले होते.कोर्ट काय म्हणाले?1घटस्फोट झाल्यावर पत्नीने पतीसोबत राहणे अपेक्षित नाही.2कलम १२५ नुसार ‘पत्नी’ या शब्दाच्या व्याख्येत पूर्वाश्रमीची पत्नीही अभिप्रेत आहे.3 घटस्फोट झाला तरी त्या दोघांमध्ये पूर्वी पती-पत्नीचे नाते होते ही वस्तुस्थिती पुसली जात नाही.
स्वत:हून घर सोडून गेलेली घटस्फोटिताही पोटगीस पात्र
By admin | Published: December 22, 2015 1:50 AM