नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २८- आयुष्यात एकमेकांना आधार देऊन सुखी संसाराची स्वप्न रंगविणारी दिव्यांग प्रेयसी प्रियकराच्या शोधात बुलडाण्यात आली. प्रियकराचा शोधही घेतला; त्याच्या घरी पोहचली,परंतु त्याच्या वडिलांनी विरोध तिला घरातून हाकलून दिले.अखेर निराश झालेल्या या तरुणीला बसस्टँडवर दामिनी पथकाने आधार दिला. रात्रभर सुधारगृहात राहिल्यानंतर तिला तिच्या मूळ पुणे या गावाला पाठविण्यात आले. ही घटना २७ सप्टेंबर रोजी घडली.प्रेम आंधळे असते, त्याला जातपात नसते, असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रतिष्ठेपायी अनेक कुटुंब आजही आपल्या मुलांच्या प्रेमविवाहाला मान्यता देत नाही. असाच अनुभव या घटनेनिमित्त आला. बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पुण्यात कॉल सेंटरवर काम करणारा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या प्रदीप (बदललेले नाव) या तरुणाचे प्रेमसंबंध दिव्यांग असलेल्या पुण्यातील प्रेमलता (बदललेले नाव) हिच्याशी जुळले. दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसल्यानंतर त्यांनी सोबतच आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, प्रदीप व प्रेमलताच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्याच्या वडिलांना समजली. प्रदीपच्या वडिलांनी त्याला काही कामानिमित्त गावाकडे बोलावले. प्रदीप गावी परत आल्यावर त्याचा प्रेमलताशी संपर्क होईना. अखेर प्रदीपच्या शोधात हेमलता त्याचा शोध घेत मंगळवारी थेट बुलडाण्यात दाखल झाली. प्रदीपने दिलेल्या त्याच्या घरच्या पत्त्यावर ती घरीही पोहोचली. प्रदीपच्या कुटुंबीयांना मात्र प्रेमलता- प्रदीपचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. मुलाच्या वडिलांनी दोघांच्या विवाहाला नकार दिला. तेवढय़ावर ते थांबले नाही, तर प्रेमलताला मारहाण करून घराबाहेर काढले. प्रेमलता रात्री आठ वाजता बसस्थानकावर पोहोचली. तेथे आपल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली. प्रेमलता रडत असताना ती पोलिसांच्या दृष्टीस पडली. पोलिसांनी तातडीने दामिनी पथकाला बोलावून घेतले. यावेळी पथकप्रमुख सायरा शाह, आशा पवार, कविता मोरे, संगीता म्हसाळ, ज्योती जाधव यांनी तत्काळ बसस्थानक गाठले. प्रेमलताची आपबिती ऐकल्यानंतर दामिनी पथकाने तिला आधार देत रात्रभर राहण्यासाठी सुधारगृहात पाठविले. बुधवारी सकाळी तिला पुण्याकडे रवाना करण्याची व्यवस्था करून रवानगी केली.-या घटनेतील दिव्यांग तरुणी पुण्यातील असून, ती प्रियकराच्या शोधात बुलडाण्यात आली होती. या दरम्यान, तिला बर्याच अडचणीला तोंड द्यावे लागल्याची भावना तिने स्वत: पथकाजवळ व्यक्त केली. तिच्या सुरक्षेसाठी रात्रभर सुधारगृहात ठेवून आज सकाळी तिला पुण्याला रवाना करण्यात आले.- सायरा शाह, दामिनी पथकप्रमुखपोलीस स्टेशन, बुलडाणा
दिव्यांग प्रेमीयुगुलाच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर !
By admin | Published: September 29, 2016 1:56 AM