मुंबई : राज्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकांमध्ये सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने पर्सन विथ डिसॅबिलिटीज् अर्थात पीडब्ल्यूडी अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपवर अधिकाधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. जेणेकरून संबंधित मतदारांना मतदार नोंदणी करण्यापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची मदत घेता येणार आहे.राज्यात २ लाख २४ हजार १६२ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात बहुतेक मतदान केंद्रे पहिल्या किंवा त्यापेक्षा अधिक मजल्यावर आहेत. या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था नसल्यास दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे जिकिरीचे ठरते. परिणामी, सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांचा शोध घेण्याचे काम प्रशासन करीत आहे. २०११च्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाख ६९ दिव्यांगांची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्या तुलनेत झालेली मतदार नोंदणी पाहता बऱ्याच दिव्यांग मतदारांनी अद्याप दिव्यांग म्हणून नोंदणी केली नसल्याची शक्यता आयोगामधील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.नोंदणी केलेल्या दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक मतदारांना या अॅपच्या मदतीने घरबसल्या मतदार नोंदणी करता येणार आहे. याशिवाय अॅपमुळे संबंधित मतदारांना मतदान केंद्र शोधता येईल, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अपंग मतदारांसह शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी निवडणुकीदिनी प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी मतदारांनी दिव्यांग असल्याची नोंद करण्याची गरज आहे. सध्यातरी दिव्यांग असल्याचे नमूद करण्यात मतदारांकडून टाळले जात असल्याची अडचण प्रशासनाला भेडसावत आहे. अपंग किंवा दिव्यांग म्हणून नोंद करण्याबाबत मनात न्यूनगंड असल्याने संबंधित मतदारांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. तरी अधिकाधिक नोंदणी व्हावी म्हणून प्रशासन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचीही मदत घेत असल्याची माहिती आहे.ज्येष्ठांची फरपट थांबणार!मुंबई शहरात ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३५ हजार इतकी आहे. त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता हा आकडा १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या ज्येष्ठांची मतदानादिवशी फरपट होऊ नये, म्हणून हे अॅप उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनो, पीडब्ल्यूडी अॅपवर नोंदणी करा! मतदान केंद्रावर मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:07 AM