पुणे : राज्य मार्ग परिवहन मंडळाने (एसटी) शिवशाही आसनी बससाठी देखील दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या समवेत असलेल्या एका व्यक्तीस तिकीट दरात ७० टक्के सवलत लागू केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून (दि. ७) करण्यात येईल. ही सवलत लागू होण्याआगोदर एखाद्या व्यक्तीने तिकीट आरक्षित केले असल्यास, त्यांना उर्वरीत रक्कमेचा परतावा दिला जाणार आहे. अपंगत्व असलेल्या राज्यातील व्यक्तींना बसच्या प्रवास दरामध्ये ७५ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के सवलत देण्यात येते. तर, ६५ टक्के आणि त्या पेक्षा अधिक उपंगत्व असलेली व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीस तिकीट दराच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. सर्वसाधारण आणि निमआराम बस प्रवासासाठी ही सवलत लागू आहे. एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी अशा प्रकारची सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे या बससाठी देखील प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना शिवशाही बस प्रवासासाठी सवलत लागू करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना शिवशाही बस प्रवासासाठी प्रवास रक्कमेच्या ३० आणि त्यांच्या समवेत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ५५ टक्के रक्कम भरावी लागेल. ज्या दिव्यांग व्यक्तींनी ७ मार्च पुर्वी तिकीट आरक्षित केले असल्यास त्यांना व आणि त्यांच्या साथीदारांना तिकिटाच्या ७० ते ४५ टक्के रक्कमेचा परतावा देण्यात येईल. सवलतीच्या दराची रक्कम सरकार एसटी महामंडळास देणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
दिव्यांगांना सुखद धक्का.."शिवशाही" मध्ये आजपासून सवलत लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:45 PM
एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती.
ठळक मुद्देआगाऊ तिकिट आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा सवलतीच्या दराची रक्कम सरकार एसटी महामंडळास देणार