पुणे : केंद्र शासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कष्ट करून स्वाभिमानाने जगणाऱ्या दिव्यांग नागरिकांनाही बँकेत १000 व ५00च्या नोटा बदलण्यासाठी यावे लागत आहे. मात्र, कोणाकडेच नोटा नसल्याने प्रत्येक जण स्वत:चे काम कसे लवकर होईल, या विचारात आहे. परिणामी दिव्यांग नागरिकांना तासनतास बँकेसमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. बँक व जिल्हा प्रशासनाने दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.गुरुवारी सकाळपासूनच बँकांसमोर नोटा जमा करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे अंध, अपंग प्रवर्गातील नागरिकही बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना इतर नागरिकांसारखेच ताटकळत रांगेत थांंबावे लागले. त्यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच राज्य अपंग कल्याण आयुक्तांना निवेदन दिले जाणार असल्याचे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.सातव म्हणाले, अपंग कल्याण कायद्यातील तरतुदीप्रमाणे दिव्यांग नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येणार नाही, अशी सोय बँकांनी केली पाहिजे. मात्र, शहरातील बहुतेक बँकांमध्ये रॅम्प बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे दिव्यांग नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच सर्वच नागरिकांना नोटा परत देण्याची घाई आहे. तसेच सुट्या पैशांची चणचण भासत असल्यामुळे रांगेत दिव्यांग उभे असतानाही नागरिकांकडून सहकार्याची भूमिका दाखवली जात नाही. काही दिव्यांग नागरिकांनी याबाबत संघटनेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी व अपंग कल्याण आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे.
नोटा बदलण्यासाठी दिव्यांगांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 2:16 AM