- सविता देव हरकरे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.05- ‘नानाविधी रंगांच्या फुलांनी बहरलेली वृक्षवल्ली, त्यावर स्वच्छंद विहार करणारी मनमोहक फुलपाखरे, पक्षांचा किलबिलाट, त्यांचे या झाडावरुन त्या झाडावर झेपावणे आणि वातावरणात मंद सुगंध पसरविणारा गार वारा’ हा अनुभवच त्यांच्यासाठी नवखा आणि जीवनात नवरंगाची उधळण करणारा होता. ही निसर्गानुभूती निश्चितच त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारी होती. दिव्यांग म्हणून एरवी वेगळी पडणारी ही बालगोपाल मंडळी नागपुरातील राजभवनात निसर्गाची सैर करताना मात्र पक्षांप्रमाणे मनसोक्त बागडत होती. निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. निमित्त होते वन्यजीव सप्ताहाचे! वन विभागातर्फे यंदा वन्यजीव सप्ताहानिमित्त काही अनोखे आणि आनंददायी उपक्रम राबविण्यात आले. लहान मुले आणि तरुण पिढीला त्यात अधिकाधिक सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न झाला. त्याअंतर्गत दिव्यांगांना घडविण्यात आलेली राजभवनाची सफर खऱ्या अर्थाने फलदायी ठरली. जैवविविधतेने नटलेला राजभवन परिसर आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन सर्वसामान्यांना मिळणे तसे दुर्लभच. पण शहरातील काही दिव्यांग मुलांना हा निसर्ग मनसोक्त अनुभवता आला. येथील जैवविविधता उद्यानातील विविध प्रजातींच्या झाडांची ओळख करुन घेता आली. फुलपाखरु उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरांसोबत खेळण्याचा आनंद लुटता आला. नक्षत्रवन आणि गुलाबवनाने तर त्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. याशिवाय दिव्यांगांसाठी निसर्ग गीत गायन स्पर्धाही घेण्यात आली. नागलवाडी, हिंगणा येथील ज्ञानज्योती अंध विद्यालयातील दिव्यांगांनी सादर केलेली एकाहूनएक सरस गाणी ऐकून वन अधिकाऱ्यांसह सर्व उपस्थितांना सुखद धक्का बसला.
दिव्यांगांची निसर्गानुभूती !
By admin | Published: October 05, 2016 4:53 PM