ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- कार्तिक शुक्ल द्वितीयेस यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यम बहिणीच्या घरी जेवायला गेला, म्हणून या तिथीस यमाची पूजा करतात तसेच याच दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जेवण करतो म्हणून त्यास भाऊबीज म्हणतात. यादिवशी यमधर्म, यमदूत, यमुना, चित्रपगुप्त, मार्कंडेय पितर यांचे पूजन करतात. पूजनानंतर प्रार्थना करावी त्यानंतर यमराजांना अर्ध्य प्रदान करावे. यानंतर बहिणीकडून भावाने पूजा स्वीकारावी. गंधाक्षतांनी त्याची पूजा करावी नंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी, व बहिणीने भावाला आवडणा-या पदार्थाचे जेवण घालावे. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते, असे म्हटले जाते.
इतिहास
धर्म ग्रंथांप्रमाणे, कार्तिक शुक्ल व्दितीयाच्या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमला आपल्या घरी बोलवुन सत्कार करुन जेवू घातले. यामुळे या सणाला यम व्दितीया या नावाने देखील ओळखले जाते. तेव्हा यमराजने प्रसन्न होऊन यमुनेला वर दिला कि जो मनुष्य या दिवशी यमुनेत स्नान करुन यमाचे पूजन करेल, त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. सूर्याची पुत्री यमुना सर्व कष्टांचे निवारण करणारी देवी स्वरुप आहे.
त्यांचे भाऊ मृत्यूचे देवता यमराज आहे. यम व्दितीयाच्या दिवशी यमुना नदीत स्नान करुन आणि तेथेच यमुना आणि यमराजची पूजा करण्याचे मोठे माहात्म मानले आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दिर्घायुष्यासाठी यमराजकडे प्रार्थना करते. स्किंद पुराणात लिहिले आहे की, या दिवशी यमराजला प्रसन्न करणा-यांना मनाप्रमाणे फळ मिळते. धन-धान्य, यश आणि दिर्घायु प्राप्त होते.
भाऊबीजसाठीचा मुहूर्त खालीलप्रमाणे
भाऊबीजसाठी सकाळी 9.30 ते 10.55 वाजेपर्यंत
सकाळी 10.55 ते दुपारी 12.25 वाजेपर्यंत
दुपारी 12.25 ते 1.45 वाजेपर्यंत
दुपारी 2.50 ते 4.20
संध्याकाळी 7.15 ते 8.33