ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच अश्विन अमावस्या, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाचा दिवस. सर्व जण आपल्या राहत्या घराची आणि कार्यालयाची साफसफाई करुन लक्ष्मी देवतेच्या स्वागताची तयारी करतात. यावेळी लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते.
लक्ष्मीपूजन शक्यतो संध्याकाळी केले जाते. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मी पूजन कसे करावे?
एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वस्तिक काढावे. श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती याची मनोभावे पूजा करावी. लाह्या बत्तासेचा नैवेद्य दाखवावा श्री सूक्ताचे पाठ करावे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे. आपल्याला पैसा कमावण्याची कला साध्य असते, पण कमावलेला पैसा कसा राखावा हे कुबेर शिकवतो. व्यापारी लोक त्यामुळेच कुबेर पूजन करतात. लक्ष्मीला घरात घाण, पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जेथे टापटीप असते तेथे तिला राहायला आवडते. जो आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो ती व्यक्ती लक्ष्मी -कुबेराला प्रिय आहे.
लक्ष्मी पूजन योग्य मुहूर्तावरच का करावे?
योग्य मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्यास ते लाभदायक ठरते, असे म्हटले जाते. या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. त्याआधी अमावस्या 29 ऑक्टोबर (शनिवार) रात्री 7 वाजून 52 मिनिटांनी सुरू होणार असून रविवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी 9 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे.
प्रदोष काळात (संध्याकाळ) केलेली पूजा सर्वाधिक फलदायी असते, असे मानले जाते. या वर्षी प्रदोष काळाचा अवधी 2 तास 32 मिनिटे असून लक्ष्मी आणि गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 8 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे. तर वृषभ काळ संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार असून रात्री 9 वाजता संपणार आहे.
लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त
सकाळी 9.30 ते 11.०० (लाभ)
सकाळी 11.०० ते 11.30 (अमृत)
दुपारी 2.00 ते 3.30 (शुभ)
सायंकाळी 6.30 ते 8.०० (शुभ)
रात्री 8.00 ते 9.15 (अमृत)