ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ : पावसासह आॅक्टोबर हीटचा तडाखा बसलेल्या मुंबईकरांची दिवाळी पहाट आता कमाल आणि किमान तापमानातील घसरणीमुळे थंडीने उजाडणार आहे. तत्पूर्वी दिवाळीच्या दोन ते तीन दिवसांपूर्वीपासूनच कमाल आणि किमान तापमानात घट होत असून, तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी चाहूल दिलेल्या थंडीने मुंबईकरांची दिवाळी आता आणखीच गुलाबी होणार आहे. मुंबईसह राज्यात थंडी चोर पावलांनी दाखल झाली असून, राज्यातील शहरांच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.
मुंबईच्या किमान तापमानातही घट होत असून, सकाळसह रात्री वाहणारे बोचरे वारे थंडीत भर घालत आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.
सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. -
२८ ते ३० आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
- ३१ आॅक्टोबर : दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.
- मुंबईत आकाश निरभ्र राहील. कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशांच्या आसपास राहील.