लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवाळीपूर्वी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरूवात करावी, अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली.योजनेंतर्गत ५६ लाख ५९ हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकांकडील सुमारे ३६ लाख कर्ज खात्यांची आणि व्यापारी बँकांकडील ३० लाख कर्ज खात्यांची माहिती आॅनलाईन व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे देशमुख यांनी सांगितले.अंमलबजावणीचा भाग म्हणून ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रि या संपलेली आहे अशा गावांमध्ये चावडी वाचनाद्वारे आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन निकषानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी ‘आपलं सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर बँकांमार्फत शेतकºयांच्या कर्ज खात्यातील रकमा निरंक करून योजनेचा लाभ देण्यात येईल. समितीचे अध्यक्ष तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, माहिती तंत्रज्ञान संचालक मुथू कृष्णन शंकरनारायणन व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.
‘दिवाळीपूर्वी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:24 AM