विलास गावंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८५ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट अधांतरी आहे. दीपोत्सव दहा दिवसांवर आलेला असतानाही महामंडळाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार निधी मिळालेला नाही. ही रक्कम मिळाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये देण्याचा विषय मार्गी लागणार आहे.
दिवाळीच्या कालावधीत एक महिन्यासाठी दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदा रद्द केली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे शंभर कोटींचे उत्पन्न बुडणार आहे. त्यातच शासनाकडूनही प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीची प्रतिपूर्ती वेळेत मिळत नाही.
६५ कोटींची मागणी
- कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.- शासनाने हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे महामंडळाचे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने ही रक्कम महामंडळाला द्यावी, असाही सूर आहे.