नवी मुंबई : एक महिन्यापासून बंद असलेल्या दगडखाणी पुन्हा सुरू झाल्यामुळे यावर अवलंबून असलेल्या ५० हजार मजूर व इतर घटकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरती मुदतवाढ दिली असून पुढील सहा महिन्यांत कायमस्वरूपी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. नवी मुंबईमधील दगडखाणींना केंद्रीय पर्यावरण विभागाने २००७ मध्ये २० वर्षांसाठी परवानगी दिली आहे. एकाच वेळी २० वर्षे परवानगी देणे शक्य नसल्यामुळे सिडकोने २०१६ पर्यंत दहा वर्षांसाठी परवानगी दिली होती. ही मुदत ३० सप्टेंबरला संपली. दगडखाण चालक मालक संघटनेने दीड वर्ष पाठपुरावा करूनही सिडकोने दुसऱ्या टप्प्यातील मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने नाइलाजाने १ आॅक्टोबरपासून ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील सर्व खाणी बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे दसऱ्यामध्येच ५० हजार खाण मजूर, वाहतूकदार व इतर व्यावसायिकांवर संक्रांत कोसळली होती. याशिवाय खडी उपलब्ध होत नसल्याने बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर सिडको प्रशासनाने सहा महिन्यांसाठी व जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. या कालावधीमध्ये पुढील दहा वर्षांसाठी परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व दगडखाणी पुन्हा सुरू झाल्या आहेत. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये बांधकाम हा प्रमुख व्यवसाय झाला असून त्यासाठी सर्वात जास्त खडी नवी मुंबईमधून उपलब्ध होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही दिवाळीच्या दिवशीच रॉयल्टी वसुलीची कार्यवाही सुरू केली असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)>एक महिन्यापासून बंद असलेल्या दगडखाणी पुन्हा सुरू झाल्या आहेत. सिडको व जिल्हा अधिकारी कार्यालयाने सहा व तीन महिन्यांची वाढीव मुदत दिली असून या कालावधीमध्ये उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे.
दगडखाण मजुरांची दिवाळीही आनंदात
By admin | Published: November 03, 2016 2:30 AM