नेरळ : नेरळ-माथेरान घाट रस्त्यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाल्याने, रस्त्याच्या दुरु स्तीच्या कामासाठी टॅक्सी संघटनेने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ढाणे यांनी आंदोलक टॅक्सी संघटनेला दिवाळीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. दिवाळीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास टॅक्सी संघटना चक्का जाम आंदोलन करणार असून आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेला घाट रस्ता प्रचंड नादुरु स्त झाला आहे. घाट रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालक यांच्यासाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा प्रवास अपघातमुक्त होण्यासाठी नेरळ -माथेरान टॅक्सी संघटनेने रास्ता रोको आंदोलन आयोजित केले होते. टॅक्सी संघटनेच्या या रास्ता रोको आंदोलनाला नेरळ आणि माथेरानमधील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. मंगळवारी १८ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन सकाळी सहा वाजता सुरु करण्यात आले. नेरळ -माथेरान टॅक्सी संघटनांच्या ४०० सभासदांनी नेरळ -माथेरान घाट रस्त्यावर हुतात्मा चौकात ठाण मांडले होते. माथेरानमधील कॉलेज विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रास्ता रोको आंदोलनातून सूट देण्यात आली होती. टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके, उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ, मंगेश मिरकुटे, हनीफ नजे, दत्ता जाधव, अर्जुन नाईक, सचिन लोभी, आनंद कोकाटे , चेतन दिसले आदींसह सर्व सभासदांना एकत्र करून सकाळी आंदोलन सुरु केले.आजचे आंदोलन हे प्रातिनिधिक असल्याचे टॅक्सी संघटनेने जाहीर केले होते. सकाळी सात वाजता रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त मदान यांच्याशी संपर्कसाधून तसा पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली. टॅक्सी चालकांचे आंदोलन दुपारपर्यंत कायम राहिल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता ढाणे यांना नेरळ -माथेरान घाट रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर घाटरस्त्याची दिवाळीपूर्वी दुरु स्ती करण्याचे पत्र प्राधिकरणाचे सल्लागार एजन्सीचे अभियंता शैलेश लिकितकर यांना पाठविले. लिकितकर यांनी ते पत्र नेरळ -माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके यांच्या हाती सुपूर्द केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. (वार्ताहर)
दिवाळीपूर्वी नेरळ - माथेरान घाट रस्ता दुरुस्तीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 3:31 AM