उस्मानाबाद : सोशल मीडियाची आभासी दुनिया कुणाला काय करायला लावेल, काही सांगता येत नाही. इंजिनीयरिंगचे शिक्षण घेणाऱ्या येथील २० वर्षीय तरूणाचे असेच पाकिस्तानमधील तरुणीशी सूत जुळले आणि हा ‘मजनू’ त्या ‘लैला’साठी वेडा झाला. तिला भेटण्यासाठी त्याने थेट बॉर्डरवरच धडक मारली. परंतु भारतीय जवानांनी त्यास सहीसलामत ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. तपासात त्याची आभासी प्रेमकहाणी ऐकून पोलिसही चक्रावून गेले.
एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रेमप्रसंग उस्मानाबाद शहरात चर्चेचा विषय झाला आहे. ख्वाजा नगर भागात राहणारा २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले़ बरेच दिवस त्यांच्यात सोशल मीडीयातूनच आणाभाका सुरू होत्या़ घरात याची कोणाला कुणकुणही नव्हती़ आठवडाभरापूर्वी घरातून गायब झाल्यावर कुटुंबियांनी शहर ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली़ तपासात पोलिसांनी घरात असलेला त्याचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्यावरील मेल, सोशल मिडीयातील अकाऊंटस्चे तांत्रिक विश्लेषण केले़ यावेळी पाकिस्तानात पत्ता दशर्वित असलेल्या एका मुलीशी त्याचा नियमित संवाद सुरु असल्याचे लक्षात आले़ सखोल तपासणीत त्यांच्यात प्रेमाच्या गुजगोष्टी होत असल्याचेही स्पष्ट झाले़ एकीकडे हा तपास सुरु असतानाच त्याचे लोकेशन घेण्याचेही काम पोलिसांनी सुरु ठेवले होते़
दोन दिवसांपूर्वी या तरुणाचे लोकेशन गुजरातच्या कच्छ भागात आढळून आल्याने पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना तो सीमापार जाण्याचा प्रयत्न करेल, अशी शंका आली़ त्यांनी तातडीने भूज पोलिसांशी संपर्क साधून तरुणाचे नाव, छायाचित्र पाठविले़ याचवेळी सीमा सुरक्षा दलास ही बाब कळविण्यात आली़ यावरुन तेथेही शोध सुरु झाला़ कच्छजवळील सीमेनजिक एक महाराष्ट्र पासिंगची दुचाकी वाळूत अडकून पडल्याचे आढळले. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता, उस्मानाबादचा हा तरुण पायी सीमेपार जाण्याचा प्रयत्न करीत असताना जवानांनी त्यास ताब्यात घेतले़ चौकशी करुन त्यास भूज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.