पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ब्रेनमध्ये ब्लडक्लॉथ असल्याने त्यांची वेळोवेळी एमआरआय चाचणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केली. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य केली. त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात यावेत. मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ससूनमधील मेडिकल टीमने २३ फेब्रुवारी रोजी त्यांची पुन्हा तपासणी करून ते पोलिसांच्या चौकशीच्या दृष्टीने तंदुरुस्त आहेत का याचा अहवाल द्यावा, असा आदेश विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दिला.डी. एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडीत असताना रविवारी रात्री झाल्याने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्या वकिलांच्या मागणीनुसार त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले दोन दिवस उपचार करण्यात येत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वेगवेगळ्या १० तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्याचा अहवाल बंद लिफाफ्यात पोलिसांकडे दिला. पोलिसांनी हा अहवाल दुपारी न्यायालयास सादर केला. डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात अर्ज करून त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यात यावे, अशी मागणी केली. शिवदे यांनी सांगितले की, ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करताना त्यांचा एमआरआय काढण्यात आला नाही. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आल्यावर तेथे एमआरआय काढण्यात आला. त्यात त्यांच्या ब्रेनमध्ये ब्लडक्लॉथ असल्याचे दिसून आले आहे. हा ब्लडक्लॉथ त्यांच्या मेंदूचा इजा पोहोचू शकतो. त्यामुळे वेळोवेळी एमआरआय काढून त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तशी व्यवस्था ससून रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच उपचार करण्याची परवानगी द्यावी.विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्याला विरोध करताना सांगितले की, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मंंगळवारी सकाळीच त्यांचे डिस्चार्ज कार्ड तयार केले होते. त्यांनी डीएसके यांच्याकडून ४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करून घेतला आहे. ससूनमधील १० तज्ञ डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्यांचा रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा ब्लडप्रेशर, शुगर नियंत्रित ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. आयसीयूमध्ये ठेवण्यासारखी क्रिटिकल परिस्थिती नसल्याने त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. ससून रुग्णालयात चांगले उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये. तसे केले तर समाजात सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळू शकत नाही, असा समज जाईल, असे सांगितले. यावर न्यायालयाने डीएसके यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत. २३ फेब्रुवारीला मेडिकल बोर्डने ते पोलीस चौकशीच्या दृष्टीने तंदुरुस्त आहेत का याचा अहवाल द्यावा, असा आदेश दिला.प्रेस्टिज इश्यू करू नयेडीएसके यांच्या वकिलांच्या अर्जाला विरोध करताना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगितले की, ससून रुग्णालयात एमआरआयची सुविधा असल्याचे सांगितले़ त्यावर श्रीकांत शिवदे यांनी जर तसे असेल तर २४ तास ससून रुग्णालयात पेशंट असतानाही त्यांचा एमआरआय काढला नसेल तर तो डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला़ त्यावर न्यायाधीश उत्पात यांनी ससूनच्या डॉक्टरांकडे चौकशी केली़ डॉ़ अजय तावरे यांनी ससूनमध्ये काय काय उपचार केले याची माहिती दिली़ त्यानंतर न्यायाधीश उत्पात यांनी ससूनच्या डॉक्टरांवरही विश्वास ठेवायला पाहिजे़ कोणीही प्रेस्टिज इश्यू करु नये़
डीएसके यांच्यावर होणार खासगी रुग्णालयात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 8:43 PM