मुंबई : फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील फटाकेबंदीवर आपलं मत मांडलं. फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच असेही त्यांनी यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं. नवी दिल्लीपाठोपाठ मुंबईतही फटाके विक्रीचे परवाने रद्द करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. निवासी भागातील फटाके विक्रीवर न्यायालयानं बंदी घातली असून, आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाई करू, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फटाक्यांना बंदी घालावी अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, फटाक्यांच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेक लोकांच्या कानांचे पडदे फाटतात, तसेच धुरामुळेसुद्धा वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाक्यांमुळे कंपन्यांना आग लागल्याचे प्रकारही समोर आले आहेत. फटाके फोडण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून ओझोनच्या थरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. रामदास कदम यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात फटाक्यांविना दिवाळी साजरी करू या, असंही आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचं रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली.
दुसरीकडे, फटाकेबंदीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतही दुफळी माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला. फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.