मुंबई : ‘आमची दालने चार दिवसांत चांगली करा पण अवास्तव खर्च करुन बडेजाव दाखविण्याची गरज नाही’, असे नवीन मंत्र्यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले. मंत्र्यांसाठी दालनांचे तसेच बंगल्यांचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने केले.नितीन राऊत, नवाब मलिक, वर्षा गायकवाड, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लगेच मंत्रालयातील आपापल्या दालनांत जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून काही दुरुस्ती सुचविली. बंगले वाटपात राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ज्येष्ठता डावलून मंत्रालयासमोरील अ-५ हा बंगला देण्यात आला होता. त्याबाबत मलिक यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याजवळ असलेला मुक्तागिरी हा बंगला देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा देवगिरी हा बंगला मिळाला आहे.शिवसेनेत क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या कार्यकाळात त्यांच्याकडे असलेला नंदनवन बंगला आणि बाजूचा अग्रदूत बंगला असे दोन्ही बंगले आधीच देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांचा बंगला आकाराने सर्वात मोठा असेल.
'दालने चांगली करा, पण अवास्तव खर्च करत बडेजावपणा नको'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:54 AM