- कुणाल गडहिरे सांगलीत जन्मलेल्या अनिकेत आवटी या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्टार्ट अप जगतात स्वत:च अस्तित्व निर्माण केले. रतनदीप देशमाने आणि अक्षय देव या मित्रांसोबत त्याने बनवलेल्या अॅपसर्फर या मोबाइल अप्लिकेशनची आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप माध्यमांनी आणि ग्लोबल स्टार्ट अप विश्वाने विशेष दखल घेतली. ग्लोबल प्रवासाबाबत अनिकेत सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी...मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:च स्टार्ट अप चालू करताना कोणत्या अडचणी आल्या ?माझं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे. वालचंद कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मला कॉलेज कॅम्पसमधून अनेक नोकऱ्या आल्या होत्या. परंतु मला सुरुवातीपासून स्टार्ट अप चालू करायचं होतं. पण एकूणच सांगली सारख्या ठिकाणी स्टार्ट अप या विषयाबद्दल किंवा एकूणच या इकोसिस्टम बद्दल फारशी माहिती नव्हती. आणि मुळात भारतात तेव्हा, आत्तासारखं स्टार्ट अपबद्दल सकारात्मक वातावरण सुद्धा नव्हतं. त्यामुळे मग सुरुवातीला मी पुण्यातल्या एका ओळखीच्या मित्राने सुरु केलेल्या स्टार्ट अप मध्ये नोकरी केली. माझं पहिलं मोबाईल एप्लिकेशन सुडोकू सॉल्वर मी तिथेच बनवलं होतं. त्याला दोन महिन्यांतच लाखो लोकांनी डाउनलोड केलं. या सगळ्या अनुभवाचा भरपूर फायदा झाला. स्टार्ट अप या विषयाबद्दल, स्टार्ट अपच्या व्यावसायिक समीकरणांची जवळून माहिती मिळाली. यानंतर मला आत्मविश्वास मिळाला कि आपण स्वत:च स्टार्ट अप चालू करू शकतो.तुझे पाहिले स्टार्ट अप कोणते होते? पुण्यातल्या मित्रांसोबत रेनीक्लाऊड टेक्नॉलॉजीची सुरुवात केली. आम्ही मोबाईल अॅप्लिकेशन्स बनवत होतो. अॅपसर्फर हे आमचं जागतिक स्तरांवर विशेष लोकप्रिय असलेलं मोबाईल अप्लिकेशन आम्ही इथेच बनवलं. लोकांच्या मोबाईलमध्ये असणारे वेगवेगळे अॅप्लिकेशन्स हे क्लाउड टेक्नॉलॉजीच्या मदतीने अपसर्फर या एकाचं अॅप्लिकेशन्समधून वापरता येणे शक्य होतं. त्यामुळे मोबाईल मधल्या स्टोरेज स्पेसच्या मर्यादेला उत्तम पर्याय मिळाला. एखादं अॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याच्या आधी प्रत्यक्ष वापरता येणे सहज शक्य होतं. जगभरातील स्टार अप विश्वाने आणि प्रमुख स्टार्ट अप माध्यमांनी याची दखल घेतली होती.अॅपसर्फरच्या ग्लोबल अनुभवातून नवीन उद्योजकांना काय सल्ला देशील ?अॅपसर्फर सुरु करताना सुमारे ९ महिने आम्ही पूर्णपणे बूटस्ट्रॅपिंग करत होतो. त्यासाठी अनेक लहान मोठे प्रोजेक्ट घेऊन आम्ही भांडवल जमा केले होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये स्टार्ट अप्सनि, त्यांचं मिनिमम व्हायेबल प्रोडक्ट लवकर आणलं पाहिजे. आपल्या संभाव्य मार्केटच्या व्यवसायिक समीकरणांचा नीट अभ्यास केला पाहिजे. सुरुवातीला आपल्या प्रोडक्टच्या निर्मितीवर लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून गुंतवणूकदारांना त्याची व्यावसायिक क्षमता समजावता येईल. भारतातील वन ९७ कडून आम्हाला १ कोटीचं फंडिंग देखील मिळालं होतं. मात्र अॅपसर्फरसाठी योग्य आणि स्केलेबल प्रॉफिट मेकिंग मॉडेल आम्हाला तयार करता आलं नाही. त्यामुळे अभूतपूर्व प्रतिसाद असतानाही आम्हाला ते बंद करावं लागलं.अॅपसर्फर बंद करण्यामागचे कारण काय होते ?एकतर आम्ही बनवलेलं प्रोडक्ट हे वेळेच्या खूप आधी बनवलेलं होतं. त्यामुळे त्याची संभाव्य व्यावसायिक समीकरणं नीट ओळखता आली नाही. दुसरी गोष्ट आम्ही फंडींगच्या पुढच्या टप्प्यासाठी योग्य प्रयत्न लवकर करायला हवे होते. आमच्यानंतर वर्षभराने आणखी काही कंपन्यांनी अशा प्रकारचे अॅप्लिकेशन तयार केले, परंतु त्यांनाही आर्थिक नफ्याची गणितं सोडवता आली नाही. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नुकतंच गुगलने अशाच प्रकाराचं अप्लिकेशन तयार केले. अर्थात गुगलकडे या विषयातील असलेलं ज्ञान, त्यांच्याकडे असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, रिसोर्सेस आणि अनुभव या सगळ्या गोष्टी आमच्यापेक्षा खूप जास्त होत्या. त्यामुळे त्यांना आम्ही सोडवत असलेली समस्या हि आणखी योग्य प्रकारे सोडवता आली.भारतीय भाषांमध्ये कोडिंग ही तुमची नवीन संकल्पना काय आहे?हा एक ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे. हि मूळ संकल्पना रतनदीप देशमाने या अॅपसर्फर मध्ये माझा सह संस्थापक असणाऱ्या मित्राची आहे. रतनदीपला त्याच्या आठवीतील भावाला कोडिंग शिकवायचं होतं. परंतु कोडिंग आणि त्यातले सिंटॅक्स हे सगळं इंग्रजीत असल्याने , ते सर्व मराठीत कसं शिकवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे ज्यांना इंग्रजी समजत नाही परंतु कोडींग शिकण्याची इच्छा आहे त्यांना मदत म्हणून प्रोजेक्ट सुरु केला आहे.स्टार्ट अप जगताचा ग्लोबल अनुभव असताना, पुन्हा नोकरी का करावीशी वाटली?अॅपसर्फरचा अनुभव अतिशय चांगला होता. त्यातून भरपूर शिकता आलं. आमची १२ जणांची चांगली टीमही तयार झाली होती. कोणत्याही स्टार्ट अपच्या लाईफ सायकलमध्ये अनेक बदल होतं राहतात. परंतु नीट विचार केल्यानंतर आम्हाला एखादी गोष्ट उगाच चालवायची म्हणून चालवणे योग्य नाही असे वाटले. याशिवाय आम्हा संस्थापकांसहित कंपनीसाठी काम करत असलेल्या टीमला सुद्धा करिअरच्या अनेक उत्तम संधी त्यावेळी समोरून येत होत्या. भविष्यात कदाचित आम्ही पुन्हा स्टार्ट अप सुरु करण्याचा विचार करू शकतो.
असा करा ग्लोबल प्रवास
By admin | Published: October 23, 2016 3:04 AM