मुंबई : वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण आणि भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी, कल्याण-१ आणि कल्याण-२ व वसई या मंडलात दि. १ एप्रिल २०१९ पासून प्रायोगिक तत्वावर खासगी वीजबील भरणा केंद्रात (महावितरणच्या कार्यालयातील तसेच ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकातील वीजबील भरणा केंद्र वगळता) महावितरणकडून पूर्वी देण्यात येत असलेल्या संगणकीकृत छापील पावत्या (प्रिप्रिंटेड) ऐवजी कोऱ्या कागदावरील संगणकीकृत पावती देण्यात येणार आहे. अशा पावतीवर 'संगणीकृत' क्रमांकाची नोंद असल्याची खात्री ग्राहकांनी करावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
ग्राहकांना विविध सेवा-सुविधा, सोप्या व सुरक्षित पध्दतीने मिळाव्यात म्हणून महावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने आपली सर्व वीजबील भरणा केंद्रे (पोस्ट ऑफीस सोडून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व त्वरित त्यांच्या खात्यावर समायोजित होतो. तसेच यामध्ये ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतू काही ठिकाणी देयकांच्या भरणाची पावती हस्तलिखित स्वरुपात देवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना संगणकीकृत क्रमांक असलेली संगणकीय पावतीचाच आग्रह धरावा. हस्तलिखीत पावती स्वीकारु नये. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच अशा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रक्कमेच्या 0.25 टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सूट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईल सुविधांचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.