मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा! यापुढे फडणवीसांना बोलावणार नाही: अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:04 AM2017-11-15T03:04:47+5:302017-11-15T03:05:08+5:30
कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले.
मुंबई : २०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले. आमचे मुख्यमंत्र्यांशी भांडण नाही, परंतु, यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व दिलीप वळसे यांच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही नेत्याच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री अथवा भाजपाच्या नेत्यांना न बोलविण्याचा निर्णय झाला़ फसलेली कर्जमाफी, वाढलेले भारनियमन, बेरोजगारी, आधारभूत किंमत मिळत नाही आहे.
सांगली पोलिसांच्या मारहाणीत झालेला आरोपीचा मृत्यू ही घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलिसांवर अंकुश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल पवारांनी
केला.
प्रत्येक बाबतीत हे सरकार अपयशी ठरले असून ‘हे माझं सरकार नाही’ म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. जाहिरातीवर सरकार चालत नाही हे भाजपावाल्यांना कधी कळणार, असा टोलाही पवार यांनी लगावला.