मुंबई - महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी बुलेट ट्रेन तर धावणारच असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या भाषणात घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात देशपांडे बोलत होते.
''मोर्चाला परवानगी नाही, मोर्चा कसा निघणार असा प्रश्न नमोरूग्ण विचारत होते. लक्षात ठेवा सरकार तुमचं असलं तरी रस्त्यावर उभे असलेले पोलीस आमचे आहेत. याच पोलिसांसाठी राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता. आता, सामान्य मुंबईकरांसाठी मोर्चा काढला आहे. प्रत्येक आपत्तीत मुंबई स्पिरीट म्हणून मुंबईकरांना गृहीत धरलं जात आहे. आज स्पिरीटसाठी नाही तर मुंबईची धमक दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे. विरोधात बोलणा-यांना सरकार नोटीस पाठवते पण फडणवीस सरकारला या मोर्चाने नोटीस दिली आहे. महसूल मंत्री चंद्रकात दादा म्हणतात की बुलेट ट्रेन धावणारच, राज ठाकरेंनी काय मोर्चा काढायचा तो काढावा. चंद्रकात दादा मनसैनिकांच्या नादी लागू नका. बुलेट ट्रेन विसरा, तुमचे मुंबई - कोल्हापूर प्रवासाचे वांदे करू'' अशा शब्दात संदिप देशपांडेंनी इशारा दिला.
मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या संताप मोर्चाला सुरुवात झाली आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील 'लोकल वाहतूक सुधारणा' हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे. हा मोर्चा मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट स्टेशनपर्यंत काढण्यात येणार आहे.
एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच काळानंतर मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. बुलेट ट्रेनला विरोध करत आधी रेल्वे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी-सुविधा देण्याची त्यांची मागणी आहे. दरम्यान, मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नाही.
राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले. खुद्द राज ठाकरे यांनीही बुधवारी फेसबुकवर पोस्ट टाकत हा मोर्चा केवळ मनसेचा नसून, सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.