ऑनलाइन लोकमतबीड, दि. १५ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात आरोपी असलेल्या माजी संचालकांना अटक करण्यापूर्वी ७२ तास आधी तशा आशयाची नोटीस पाठवावी, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश पानसरे यांनी पोलिसांना शुक्रवारी दिले.अंबाजोगाई तालुक्यातील आंबा सहकारी सहकार साखर कारखाना बेकादेशीर कर्ज प्रकरणातील आरोपी पांडुरंग विठ्ठल गाडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी न्यायालयाने विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी सरकारी वकील अजय राख यांनी डीसीसी घोटाळा १४१ कोटींचा असल्याचे सांगत अटक करावी अशी मागणी केली तर एसआयटी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला आपली बाजू मांडताना सांगितले की, कोणत्याही आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही; मात्र माजी संचालक बँक तपासातील कागदपत्रे मिळण्यास अडथळा निर्माण करतील, तसेच घोटाळ्यातील आरोपींनी आपली संपत्तीचा अहवाल दिला नसल्याचे सांगितले. ही बाब न्यायालयाने अधोरेखित करीत डीसीसी घोटाळ्यातील आरोपींना ७२ तासांपूर्वी अटकेसंदर्भात नोटिस दिल्याशिवाय अटक करू नका, असे आदेश दिले. त्यांनाही न्यायालयीन प्रक्रिया अर्थात जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा यामुळे मिळाली आहे. तूर्त या प्रकरणातील सर्व आरोपींना आता दिलासा मिळाला आहे. एसआयटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उप अधीक्षक राजकुमार चाफेकर, पो.नि. विद्यानंद काळे यावेळी न्यायालयात उपस्थित होते. आरोपी गाडे यांच्या वतीने अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.
डीसीसी घोटाळ्यातील आरोपींना नोटीस दिल्याशिवाय अटक करू नका
By admin | Published: July 15, 2016 8:49 PM