मुंबई : मराठवाडा व विदर्भामध्ये पाण्याची पातळी जवळपास शून्य टक्क्यावर गेली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर आहे आणि अशा स्थितीत त्याबाबत माहिती द्यायला सरकारचे विशेष वकील उपस्थित नाहीत, ही सबब देऊन टाळाटाळ करू नका. पुढच्या सोमवारी वकिलांना हजर करा; अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ, अशी तंबीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दुष्काळासंदर्भात आखलेल्या मागदर्शक तत्त्वांची व दुष्काळ संहितेत नमूद केलेल्या सर्व उपाययोजना राज्य सरकारने आखाव्यात आणि दुष्काळ संहितेनुसार बंधनकारक असलेला दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती मराठवाड्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी नोटीस आॅफ मोशनद्वारे केली आहे.राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला असताना, राज्य सरकारने कायद्याला अनुसरून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या नसल्याने, संजय लाखे-पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे नोटीस आॅफ मोशन दाखल केले. न्या. अजय गडकरी व न्या. एन. एम. जमादार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.
या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांची विशेष वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारच्या सुनावणीत साखरे अनुपस्थित असल्याने उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. मराठवाडा व विदर्भ या भागांत पाण्याची पातळी शून्य टक्के आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील दुष्काळी भागातील स्थिती भीषण आहे. अशा स्थितीत विशेष वकील उपस्थित नाहीत, अशी सबब देऊन टाळाटाळ करू नका. ते उपस्थित नसतील, तर त्यांच्याकडून ही केस काढून घ्या. पुढील सोमवारी वकिलांना हजर करा; अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ, अशी तंबी न्यायालयाने राज्य सरकारला दिली.पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाईकेवळ विदर्भ व मराठवाडाच नव्हे, तर अन्य भागांतही दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाºयाची टंचाई, सर्वत्र सुरू नसलेल्या चारा छावण्या, चाºयाचे वाढलेले भाव यांमुळे ग्रामीण भागातील लोक हैराण आहेत. त्यामुळे न्यायालयात काय होणार व तेथून काही आदेश सरकारला दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.