जावेद खान ल्ल सातारा येथील जिल्हा रुग्णालय परिसरात तिचा नेहमीचाच वावर... थंडीचा कडाका वाढल्याने ‘ती’ रस्त्याच्या कडेला कुडकुडत... ‘तिची’ दयनीय अवस्था न पाहावल्याने स्थानिक नागरिकांनी तिला महिला सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेतला; पण ‘माझा भाऊ खंबीर आहे मदत करायला... मला नकोय तुमची मदत...’ म्हणून मदत नाकारली. हे चित्र आहे सातारा येथील जिल्हा रुग्णालय परिसरात शनिवारी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी घडलेली. याबाबत माहिती अशी की, सातारा शहरात स्त्री आणि मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते शहरात फिरून मिळेल ते खाऊन जीवन जगत आहेत. त्यातील अनेकांचा कोणालाही त्रास नाही. त्यातील अनेकांना स्वत:चे नाव, गाव अन् नातेवाइकांचाही पत्ता नाही. ऊन, पाऊस आणि थंडीत खडतर जीवन जगत जगणारे मनोरुग्ण नेहमीच दिसतात. सातारा शहरात मात्र अशांच्या मदतीला हजारो हात धावून येत असतात. कोणी चादर, सतरंजी देतात तर कोणी कपडे देतात. काहीजण न चुकता खाण्यासाठी काहीतर देतात. या व्यक्तींना पैशांचा फारसा उपयोग होत नाही. या मनोरुग्णांचा कोणालाच त्रासही होत नसल्याने त्यांच्याबद्दल कोणाचीच तक्रार येत नाही. जिल्हा रुग्णालयाच्या दोन नंबरच्या मुख्य प्रवेशद्वारात संबंधित मनोरुग्ण दोन दिवसांपासून साधारणत: साठ ते सत्तर वर्षांची एक वृद्ध मनोरुग्ण दिसत आहे. ती थंडीतही एकाच ठिकाणी कुडकुडत बसलेली असते. तिला पाहिल्यानंतर सातारकरांनी कपडे, चादर तर काहींनी दिवाळीचा फराळ खाण्यास दिला आहे. त्याचवेळी एकाने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला असता इतक्यावर शांत बसून राहिलेली महिला एकदम आक्रमक होऊ बोलू लागली. सुरुवातीस ‘मला जायचं आहे. मला घरी जायचंय... मला सोडा’ म्हणायला लागली. त्यानंतर ‘मला भाऊ सोडून गेला आहे. तो येथे येणार आहे. मी त्याची वाट पाहत आहे,’ त्यावेळी तिला तिचा पत्ता विचारला असता, ‘मला कोणाच्या मदतीची गरज नाही. माझा भाऊ खंबीर आहे मदत करायला. तुम्ही माझ्यासाठी त्रास घेऊ नका, जावा तुम्ही,’ म्हणत तिनं मदत नाकारली. याची माहिती मिळताच ‘जिजाऊ प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा सिध्दी पवार व त्यांच्या कार्यकत्यांनी भावाचा शोध घेण्याचा प्रयनही केला. या महिलेची अवस्था पाहिल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांच्याच पापण्याच्या कडा पाणावल्या होत्या. ऐन दिवाळीत सोडून जाणारा ‘तो’ भाऊ कोण? भाऊबीजेदिवशी बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी कोसो दूरहून भाऊ बहिणीकडे येत असतो. नाहीच जमलं तर किमान बहीण तरी त्याच्याकडे जाते, हा आजवरचा अनुभव सर्वांनाच आहे. घराचा पत्ता न दिल्याने अपयश जिल्हा रुग्णालय परिसरात आणून आपल्या मनोरुग्ण वृद्ध बहिणीला सोडून जाणारा ‘तो’ भाऊ कोण असावा, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्याला योग्य धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी संबंधित वृद्धेकडे पत्ता विचारलाही; मात्र तिने काहीच माहिती न दिल्याने अपयश आले.
या ‘बिचारी’ला भीक नको.. भाऊ हवाय !
By admin | Published: November 15, 2015 12:50 AM