पुणे - वाढत्या शहरीकरणानंतर एक नवीन समाज व्यवस्था निर्माण झाली आहे़ अशा परिस्थितीत पोलिसांनी देखील त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. पोलिसांची भीती नको तर भरोसा हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुणे पोलीस आयुक्तालयात एकाच छताखाली महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘भरोसा सेवा संकुल’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले़ याप्रसंगी ते बोलत होते़ पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पोलीस दल एक सेवा देणारी यंत्रणा आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्यात तसेच पोलिसांकडे तक्रार, समस्या घेऊन येणाºया सामान्यांना न्याय देण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे़ त्यासाठी पारंपारिक पद्धतीने पोलीस काम करु शकत नाही़ त्यासाठी समुपदेशन हा चांगला मार्ग आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी नागपूर शहरात पोलीस आयुक्त असताना भरोसा सेल या उपक्रमाची सुरवात केली होती़ वेकटेशम हे पोलिसांमध्ये सुधारणावादी अधिकारी असल्याचे सांगितले़
दत्ता पडसलगीकर यांनी पुणे पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. पोलिसांची जी कामे पुण्याच्या हिताच्या दृष्टीने चांगली आहेत, अशा कामासाठी पोलिसांच्या मागे किंवा पुढे नाही तर त्यांच्याबरोबर राहू असा भरोसा देत असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
प्रांरभी डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला़ पुण्यात नागरिक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवितात़ आम्हाला हे शहर डग्ज फ्री करायचे आहे़ पासपोर्ट व्हेरिफिकेशन आता ५ दिवसात होते़ शहरातील १२५ पोलीस चौक्यांचे सक्षमीकरण करायचे आहे़ पोलिसांचे संख्या बळ वाढविता येत नाही तर त्यांचे कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ डिसेंबरमध्ये प्राणघातक अपघात ३५ टक्क्यांनी घटले. पोलिसांकडून नागरिकांना सेवा देण्याच्या प्रयत्नात आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी गोळीबार करुन पळून जाणाºया दिल्लीतील गुन्हेगारांना पकडताना गोळीबारात जखमी झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि अॅप बनविणारी तनया सुनिल फुलारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले.
शासनाच्या खात्यांचे भारत पाकिस्तानसारखे संबंध
पुण्यात पोलीस, महापालिका, जिल्हाधिकारी यांच्यात समन्वय असल्याचे सांगितले गेले. शासनाचे अनेक विभाग इतके अंतर ठेवून वागतात की ते भारत पाकिस्तान सारखे असल्याचे वाटतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिका-यांना लगावला.