- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत मंदिर, मशीद, चर्च आणि सगळी प्रार्थना स्थळं बंद होती. देवही कुलूपबंद होता. मात्र, डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील प्रत्येक कर्मचाºयाने माणुसकी जपत रूग्णांची सेवा केली. तेच खरे देवादीदेव होत. त्यामुळे आता प्रार्थना स्थळांमध्ये बंदीस्त असलेल्या देवाला पुन्हा बाहेर आणण्याचा प्रयत्न करू नका, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीत आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्याला ना. राजेश टोपे, बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, शाहीर रामदास कुरंगळ, यशवंतजी सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जूनराव तनपुरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समितीचे कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, एन.डी. पाटील, योगेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अॅड. खेडेकर म्हणाले की, प्रार्थना स्थळे उभारण्यानं कुणाचंही भलं झालेले नाही, याची प्रचिती कोरोना तसेच जगातील प्रत्येक नैसर्गिक आपत्ती काळात आली आहे. प्रार्थनास्थळांमधून वाईट प्रथा आणि अत्याचाराच्या घटनांना इतिहास साक्ष आहे. त्यामुळे आता प्रार्थना स्थळांमध्ये बंदीस्त असलेल्या देवाला पुन्हा बाहेर आणण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन खेडेकर यांनी केले. जिजाऊ ब्रिगेडने आगाम काळात राजसत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे, यासाठी मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महिलांना शंभर टक्के स्थान देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करा, असे सुतोवाच करून त्यांनी अमेरीकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे सप्रमाण उदारहण दिले. आपल्या देशातील शेती आणि शेतकरी कायमच दुरावस्थेत आहेत. त्यासाठी कुठल्या आपत्तीची वाट पहावी लागत नाही. कोरोना काळाने अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. मात्र, शेतकरी यात अधिकच भरकडला गेला. असं सांगून खेडेकर यांनी कृषी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जी समिती नेमण्याचे सांगितले आहे. त्याचे स्वागत केले. अमेरीकेच्या राजकारणाचा धागा पकडत पुरूषोत्तम खेडेकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ट्रम्प गेले हे बरेच झाले. आता हाऊडी मोदी कोण म्हणणार, असा चिमटाही त्यांनी काढला. दरम्यान, आपल्या देशातील सरकार सामाजिक द्वेष पसरविण्याचे प्रयत्न करीत आहे. देशात असहिष्णू वातावरणामुळे विरोधाभास निर्माण होत आहे. एकीकडे अनेक धर्मिय समाज असलेले देश एकीचे वातावरण निर्माण करीत आहेत. तर दुसरीकडे भारतात दुही माजविण्याचा होत असलेला प्रयत्न निंदणीय असल्याचेही ते म्हणाले. मराठा सेवा संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व्यसनांपासून दूर राहीले पाहीजे आणि आपले शरीर आणि आत्मबल वाढविले पाहीजे, असे आवाहन करून खेडेकर यांनी कोरोनाने आपण सारेच आॅनलाइन झालो आहोत. त्यामुळे सेवा संघाचे भविष्यातील कार्यक्रमही आनलाइन असतील. असे सांगून, त्यांनी सेवा संघ आणि त्यांच्या उपशाखांचे पदाधिकारी नव्याने नियुक्त करण्याच्या सूचना केल्या. संचालन चित्रा मानकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अर्जूनराव तनपुरे यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम आॅनलाइन दाखविण्यात आला. हा कार्यक्रम सुमारे २५ लाख लोकांनी बघितला. त्यामुळे सिंदखेड राजा, महाराष्ट्राबाहेरही हा कार्यक्रम जाण्यास कोरोनाची मदत झाली. वाईटातून चांगलं घडण्याचाच हा प्रकार असल्याचा दावाही यावेळी मराठा सेवा संघाने यावेळी केला.
कोरोनाकाळात प्रार्थनास्थळांमध्ये बंद झालेल्या देवाला पुन्हा बाहेर काढू नका - अॅड. पुरूषोत्तम खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 6:55 PM
Purushottam Khedekar News देवाला पुन्हा बाहेर आणण्याचा प्रयत्न करू नका, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी येथे केले.
ठळक मुद्देजिजाऊ सृष्टीत आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.आता हाऊडी मोदी कोण म्हणणार, असा चिमटाही त्यांनी काढला.