‘स्पिरिच्युअल पॅरेंटिंग’ पुस्तकाचे प्रकाशन : प्रबोध यांचे प्रतिपादन नागपूर : पालकत्व म्हणजे, केवळ मुलांना शिकविणे नाही तर मुलांकडूनही आपण शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक मूल स्वत:चे भाग्य घेऊन येते. त्यामुळे त्याच्यावर अनावश्यक अपेक्षांचे ओझे लादू नये, असे प्रतिपादन डॉ. प्रबोध यांनी केले. डॉ. सपना शर्मा यांच्या ‘स्पिरिच्युअल पॅरेंटिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या सभागृहात रविवारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे व डॉ. कृष्णा शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सपना शर्मा यांनी प्रास्ताविकातून ‘स्पिरिच्युअल पॅरेंटिंग’ या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती दिली. त्या म्हणाल्या, अनेकांनी पुस्तकाच्या शिर्षकामधील ‘स्पिरिच्युअल’ या शब्दावर शंका-कुशंका व्यक्त करून, तो शब्द काढण्याचा सल्ला दिला. मात्र यामधील ‘स्पिरिच्युअल’ चा अर्थ धर्माशी नाही. ‘स्पिरिच्युलिटी’ एक सत्य आहे. आम्ही मुलांना नेहमीच मार्गदर्शन करतो. परंतु त्यांच्याकडून काहीच ऐकून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ‘स्पिरिच्युअल पॅरेंटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘स्पिरिच्युअल पॅरेंटिंग’ या पुस्तकातून बालपण फुलत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पालक स्वत:ला नेहमीच मुलांपेक्षा अधिक अनुभवी समजतात. त्यामुळे मुलांकडून आपण काय शिकावे, त्यांच्याकडे शिकण्यासाठी आहे, तरी काय, असा विचार करतो. परंतु मुलांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, हे विसरून चालणार नाही. डॉ. सपना शर्मा यांनी आपल्या पुस्तकातून तेच सांगण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेश म्हात्रे यांनी आज आपण आधुनिकीकरण व विकासाच्या धावपळीत घरातील संस्कार विसरत चाललो असल्याचे सांगितले. सध्या समाजात एक विचित्र अभिसरण सुरू असून, त्याची मीमांसा घरापासून सुरू झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी स्मिता माहूरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका
By admin | Published: September 22, 2014 12:53 AM