मुंबई : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला खात्यातील पदवीधर कॉन्स्टेबलकडून उघडपणे विरोध वाढत आहे. त्या रद्द करू नका, अशी विनंती थेट प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे रविवारी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून अनेकांनी केली. पांडे मात्र त्याबाबत आग्रही राहिले. हा निर्णय सर्व अंमलदारांसाठी उपयुक्त ठरेल, असे ते सांगत होते. संजय पांडे हे दर रविवारी सोशल मीडियावरून आपण केलेल्या कामाची माहिती देत आहेत. रविवारी त्यांनी थेट फेसबुक लाइव्ह माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला. कॉमेंट बॉक्समध्ये ते आपल्या समस्या मांडीत होते. त्यावर पांडे यांनी उत्तरे दिली. त्यात सहभागी असणाऱ्यांमध्ये बहुतांश अंमलदारच होते. कॉन्स्टेबलची एमपीएससीकडून होणारी परीक्षा रद्द करून त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा प्रस्ताव बनविला आहे. मात्र गुणवत्तेच्या आधारावर परीक्षा देऊन अधिकारी होऊ इच्छिणारे कॉन्स्टेबल त्याविरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व आमदारांकडे निवेदन देत आहेत. पांडेंच्या आजच्या फेसबुक लाइव्हवर काहींनी धाडस दाखवून त्याबाबत विचारणा केली. २४ तास आराम देण्याचे नियोजनया वेळी एका प्रश्नावर पांडे यांनी मुख्यालयाकडून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेतील सेवाज्येष्ठतेची यादी आता थांबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. अंमलदाराने १२ तास ड्यूटी केल्यानंतर २४ तास त्याला आराम देण्याच्या दृष्टीने ड्यूटीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. एसआरपी जवानांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पीएसआयच्या खात्यांतर्गत परीक्षा रद्द करू नका; अंमलदारांचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 7:17 AM