लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती (जि. पुणे) : नानाच्या (विश्वास देवकाते) एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. मला सगळ्यांनी सांगितले. वेगवेगळे सहकारी आले. त्यांनी सांगितलं, दादा एवढ्या वेळेस वाचवा. त्याचवेळी सांगितले, एवढीच वेळ, पण पुन्हा जर त्या मार्गाला लागला, परत चुकला तर पुन्हा अजित पवारांकडे त्या कारणासाठी यायचं नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी निरावागज येथे मिश्कीलपणे सांगितलेला किस्सा चर्चेत आला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या गावात सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, अधिकारी मला म्हणतात की, दादा तुम्ही एवढे कडक बोलता आणि यांना कसे पाठीशी घालता? यामध्ये शेवटी माझाही कमीपणा होतो. पण जिवाभावाची माणसं, म्हणून मलाही थोडेफार यामध्ये माघारी फिरावे लागते. मात्र, आता तसं कोणी होऊ देऊ नका, चुकीचे कोणीच वागू नका, असे आवाहन त्यांनी केले.
...याबद्दल सरकारने उत्तर द्यावं : सुप्रिया सुळे
अजित पवारांनी कुणालाही मोक्कापासून वाचविले असेल तर हे धक्कादायक आहे. याबद्दल सरकारने उत्तर द्यायला हवं. त्यांनी कोणाला वाचवलं? मोक्कामधून वाचण्याची कारणे कोणती होती? याची माहिती द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.