पुणे : मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले. आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते. उच्चभ्रू वृत्तीला छेद देणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो का? प्रत्येक गोष्ट आम्हाला भांडून का मिळवावी लागते? माणसे म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी आज येथे काढले.शहरी व ग्रामीण भागातील वसाहतींच्या विकासाशी निगडित समन्वय साधणाऱ्या हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘संघर्ष आणि सामर्थ्य : शहरातील श्रमजीवींच्या कथा’ हे पुस्तक तयार केले आहे. त्याचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते झाले. महापौर प्रशांत जगताप, इनहॅप संघटनेचे अध्यक्ष कीर्ती शहा, पालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, जाणीव संघटनेचे अध्यक्ष विलास चाफेकर, अंगणवाडी कर्मचारी सभा अध्यक्ष नितीन पवार, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या सुरेखा गाडे, दगडखाण कामगार विकास परिषदेचे संजय संख्ये, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे आदी व्यासपीठावर होते.हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा, जाणीव संघटना, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत, दगडखाण कामगार विकास परिषद अशा ६ संघटनांच्या सदस्यांच्या संघर्षाची कथा यात आहे. कीर्ती शहा म्हणाल्या, श्रमिकांच्या विकासासाठी, सन्मानासाठी, हक्कांसाठी होणाऱ्या संघर्षाची कथा यामध्ये आहे. गरिबांना समजावून घेणारी, त्यांच्या संवेदनांशी एकरूप होणारी शहरे या देशामध्ये असली पाहिजेत. महापौर जगताप यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मोळक, चाफेकर, पवार, गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींचा पाटेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नीता पवार यांनी आभार मानले.>सर्वात प्रथम देश महत्त्वाचा त्यानंतर आम्ही कलाकार. देशात कलाकार खटमल एवढे आहेत. देशापुढे आमची किंमत शून्य आहे. आपल्या देशाचे जवान हेच खरे हिरो आहेत. त्यांच्याप्रति कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. सीमेवर युद्ध नसते तेव्हा तेथे एकमेकांत भाईचारा असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांनी पुन्हा येण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल, असे बजावून पाटेकर यांनी, आम्ही बोलतो त्याकडे लक्ष देऊ नका. तसेच, ज्यांची लायकी नाही अशांना महत्त्वही देऊ नका, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सलमान खानने पाक कलाकारांना काम दिले पाहिजे असे वक्तव्य केले होते, त्यावर पाटेकर म्हणाले, सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा दिलेला नाही.
जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका
By admin | Published: October 03, 2016 1:46 AM