अजित पवारांना धरणांकडे फिरकु देऊ नका : उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:47 PM2018-10-22T20:47:59+5:302018-10-22T20:51:25+5:30
‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला.
खेड/राजगुरूनगर: सध्या राष्ट्रवादी पक्षाची भीती वाटते. कारण धरणे सुकू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या आजुबाजुलाही अजित पवारांना फिरकू देऊ नका अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्याचवेळी न्यायासाठी माझी भूमिका असून ती सरकार विरोधात असली तरी मला त्याची फिकीर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजगुरूनगर येथे सोमवारी शेतकरी मेळावा तसेच क्रांतिकारकांच्या स्मारक अनावरण व हुतात्मा राजगुरू पुलाच्या उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याप्रसंगी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गो-हे, सुरेश गोरे व गौतम चाबुकस्वार, संपर्क नेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे ,माजी सभापती रामदास ठाकूर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्रातील मोदी सरकार थापाडे आहे. योजना, आश्वासने आणि थापांचा पाऊस पाडणा-या सरकारला दुष्काळ कुठे आहे हे दिसत नाही. या दुष्काळात गाजराची शेती मात्र बहरली आहे. सरकार शेतक-यांना फसवत आहे. दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ त्यांना दिसत नाही.त्यांचा योजना आणि थापांचा पाऊस त्यांचा सुरू आहे. केवळ गाजराची शेती बहरली आहे असा टोला त्यांनी केंद्र सरकारच्या कामावर लगावला. संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची मागणी असताना कुचकामी व फसवी कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातील शेतक-यांना फसविण्यात आले. भगव्याचे राज्य येणारच असा विश्वास व्यक्त करून बैलगाडा शर्यत सुरू करणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेडमध्ये राजगुरूंच्या नावाने अनेक संघटना आहेत. मात्र कोणीही यथोचित स्मारक उभारले नाही. १९७८ साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पूर्वीच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेस त्यांनी तीनही शहीदांचे पुतळे उभारण्याची सूचना केली होती. आज चाळीस वर्षांनी ते पूर्णत्वास आले आहे. डॉ आंबेडकरांचेही भव्य स्मारक उभारण्याची मागणी आहे. आगामी काळात हे स्मारक उभारले जाईल.
यावेळी आढळराव यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. खेड तालुका हा सर्वात आवडीचा मतदारसंघ असल्याने येथे जास्तीस जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येथील दिलावरखान स्मारक आतापर्यंत सर्वांकडून दुर्लक्षित राहिले. मात्र, आपण केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करून त्यास ३ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अथक पाठपुरावा करून केदारेश्वर पूल बांधला आहे. बनकरफाटा ते राजगुरुनगर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करणार आहे. बैलगाडा शर्यतीत अडथळे आणणा-या पेटा संघटनेला धडा शिकवणार आहे.
यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. आभार जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर यांनी मानले.
......................