भाजपाच्या फसव्या घोषणेला बळी पडू नका : धनंजय मुंडेनातेपुते : जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत खरे तर गल्लीतील समस्यांवर चर्चा व्हायला पाहिजे होती. परंतु मुख्यमंत्री या निवडणुकीत दिल्लीतील चर्चा करत आहेत. त्यामुळे आम्हालाही दिल्लीची चर्चा करावी लागत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मोदींनी अच्छे दिन आणे के लिये भाजपला मत मागितले. परंतु आता अच्छे दिनची चेष्टा झाली आहे. त्या अच्छे दिनमुळे लोकसभेच्या निवडणुकीत परिवर्तन झाले, परंतु अच्छे दिन आले नाहीत. विदेशी काला धन लायेंगे म्हटले होते, परंतु काला धन तर आले नाही़ तुमच्या कष्टाचे पैसे काढण्यासाठी ज्यावेळी तुम्ही रांगेत होता त्यावेळेस काळा पैसा वाला रांगेत दिसला का? त्यामुळे भाजपच्या फसव्या घोषणेला बळी न पडता राष्ट्रवादीला मतदान करा, असे आवाहन विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे केले.नातेपुते येथे नातेपुते, दहिगाव, मांडवे जि.प. गट व नातेपुते, फोंडशिरस, दहिगाव, गुरसाळे, मांडवे, भांबुर्डी पं.स. गणाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी आ. हनुमंतराव डोळस, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, आर. पी. आयचे नेते नंदकुमार केंगार, मामासाहेब पांढरे, चंद्रकांत कुंभार, महावीर साळवे, युवराज वाघमारे, बादल सोरटे, नातेपुते जि. प. गटाचे उमेदवार रतन जनार्धन सोरटे, गणाचे उमेदवार रणजित आगतराव, फोंडशिरस गणाच्या विद्या हनुमंत वाघमोडे, दहिगाव जि. प. चे उमेदवार ऋतुजा शरद मोरे, दहिगाव पं. स. गणाचे उमेदवार किशोर शिवाजीराव सूळ, गुरसाळे पं. स. गणाचे उमेदवार प्रतिभा अविनाश देशमुख, मांडवे जि. प. गटाचे उमेदवार धनश्री तानाजी पालवे, मांडवे पं. स. गणाचे उमेदवार मानसिंग धोंडिबा मोहिते, भांबुर्डी पं. स. गणाचे उमेदवार महानंदा बाळू भोसले आदी उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, धनगर समाजाला एस. टी. आरक्षण देऊ सांगितले, तेही दिले नाही. धनगर समाजाचे दोन कॅबिनेट मंत्री असूनही आरक्षणासाठी त्यांनी काही केले नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांना धनगर, मराठा, मुस्लीम, दलितांना फसवले़ समाज सेवा म्हणजे काय, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास कसा करावा, हे आपण मोहिते-पाटील घराण्याकडून शिकलो आहोत. त्यामुळे यावेळेस राष्ट्रवादीला मतदान करावे, असे आवाहन मुंडे यांनी केले.यावेळी जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले, माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा सहकार महर्षींनी आणली होती. त्यांच्यानंतर दुसरी पिढी खा. विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या बंधूंनी तालुक्याचा विकास केला. आज तिसरी पिढीचे नेतृत्व रणजितसिंह मोहिते-पाटील करीत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीला मतदान करावे, असे आवाहन केले. (वार्ताहर)
भाजपाच्या फसव्या घोषणेला बळी पडू नका : धनंजय मुंडे
By admin | Published: February 17, 2017 8:11 PM