जगदीश कोष्टी -सातारा एखाद्या वस्तूंसाठी कोसो दूर वेळ अन् पैसा खर्च करून जाणं शक्य नसतं, त्यातून कुरिअरसारख्या पर्यायाचा जन्म झाला. पण याच पर्यायाचा गैरवापर केल्यामुळे काय धोका संभावतो, याचा प्रत्यय चार दिवसांपूर्वी भुर्इंजमध्ये आला. पिस्तूल, तलवारी, जंब्यासारखा शस्त्रसाठा चक्क पंजाबमधून तोही कुरिअरने आल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरुन कोणाचाच कोणाला मेळ नसल्याचे आणि काहीही द्या सुरक्षित पोहोचत असल्याचेच समोर आले आहे.सातारा जिल्हा शांत म्हणून एकेकाळी ओळखला जात होता. एकेकाळी अशाचसाठी की कऱ्हाडमध्ये गँगवारचे प्रस्थ वाढत चालले आहे. अनेकजण ‘घोडा’ कमरेला अडकवूनच फिरत आहेत. त्यात कमी म्हणून की काय, भुर्इंजचे प्रकरण उद्भवले. एका रात्रीत मोठा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखा आणि भुर्इंज पोलिसांनी हस्तगत केला. हा शस्त्रसाठा चक्क कुरिअरने आला असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सुमारे २१ विविध कंपन्यांमार्फत कुरिअरसेवा दिली जाते. या कंपन्या कशाप्रकारे सेवा देतात, याची माहिती घेतली असता यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही कंपनीकडे स्कॅनिंग यंत्रणा नाही. वस्तू स्वीकारण्यापूर्वी एजंट काही काळजी जरुर घेतात. यामध्ये मौल्यवान वस्तू, पैसे, ज्वालाग्राही पदार्थ तर खोक्यातून पाठविले जात नाहीत ना, याची ग्राहकाकडे चौकशी करतात. खाद्य पदार्थ, कपडे, डायरी यासारख्या घरगुती वस्तू असतील तर पाठविणाऱ्यांकडून तसं लेखी घेतलं जातं. तर कंपन्या, कार्यालयांच्या पार्सलसंदर्भात वस्तूंचे चलन जोडले जाते. आपणाकडे बहुतांश प्रमाणात जमिनीवरुन वाहतूक केली जाते. त्यामुळे या प्रवासादरम्यान रेल्वे, ट्रक वाहतूक किंवापार्सल कंपन्यांच्या वाहनांतून वाहतूक केली जाते. त्यामुळे या मार्गात कोठेही धातूशोधक यंत्राद्वारे तपासणी केली जात नाही. त्यामुळेच बहुधा शस्त्रांची वाहतूक करणे सोपे गेले असावे. ज्या वस्तू हवाई मार्गाने वाहतूक होणार आहेत, त्याच वस्तू विमानतळावर स्कॅनिंग केल्या जातात. क्राईम जगताचं नवं रूपविनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असते. अशांना अटक केल्याचेही उघड झाले आहे. पण यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी नामी शक्कल लढविल्याचे भुर्इंजच्या घटनेतून उघड झाले आहे. यामध्ये कोणत्याही खोट्या पावत्या दिल्या की कुरिअर कंपन्या पार्सलची वाहतूक करतात आणि हव्या त्या व्यक्तीच्या घरी पोहोच होतात. तर पोलिसांना कळवावेसातारा शहरातही ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून माल येतो. यात मोठी खोकी असतात. प्रत्येक व्यापारी किंवा ट्रान्स्पोर्ट कंपन्यांकडे गुन्हेगारांच्या नजरेतून न पाहता अशा ट्रान्स्पोर्टची यादी करणं, वाहतूक करणाऱ्या खासगी कंपन्यांची बैठक घेऊन समन्वय ठेवणे महत्त्वाचे आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
काय बी द्या... ‘कुरिअर’नं येतंयच!
By admin | Published: August 26, 2015 9:39 PM