जयेश शिरसाट, मुंबईसहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांचा तापट व शीघ्रकोपी स्वभाव लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भविष्यात त्यांच्या हाती शस्त्र देऊ नका, अशा सूचना केल्या होत्या. या सूचनेची अमलबजावणी झाली असती तर कदाचित शिर्र्कें सह वरिष्ठ निरिक्षक विलास जोशींचाही जीव वाचला असता, अशी चर्चा पोलीस दलात आज होती.काल संध्याकाळी आठच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात शिर्के यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार करत वरिष्ठ निरिक्षक जोशी यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही त्याच रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. रात्री उशिरा पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यानुसार गुन्हे शाखेने सात ते आठ जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात वरिष्ठ निरिक्षक जोशी यांच्या शासकीय वाहनावरील आॅपरेटर बाबासाहेब अहेर यांचाही समावेश आहे. अहेर कालच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार डोळयांनी पाहाणाऱ्या पोलिसांनी गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार शिर्र्केंनी दोन गोळया जोशींवर झाडल्या. त्यातली एक जोशींच्या पाठितून शिरली आणि पोटातून बाहेर पडली. तर दुसरी गोळी जोशींना न लागता पोलीस शिपाई अहिरे यांच्या मांडीला चाटून गेली. अहेर यांच्यावर रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर जोशी यांच्या पोटात शिरलेल्या गोळीने त्यांची किडणी निकामी केली. गुन्हे शाखेने जबाब नोंदविण्यासोबत शिर्र्कें च्या पोलीस ठाण्यातल्या वावराबददलही चौकशी केली. त्यातून ते अत्यंत तापट व शिघ्रकोपी स्वभावाचे होते, अशी माहिती पुढे आली. तसेच जानेवारी महिन्यात शिर्के तब्बल ३८ दिवस रूग्णनिवेदनात(सीक लीव्ह) होते. त्यात त्यांनी हायपर टेन्शनबाबत डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याचेही गुन्हे शाखेला समजले आहे. (प्रतिनिधी)
त्याच्या हातात शस्त्र देऊ नका..!
By admin | Published: May 04, 2015 1:50 AM