कोल्हापूर : विधानपरिषदेची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळू नये, यासाठी आ. महादेवराव महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मोट बांधली आहे. हे तिन्ही नेते एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तशी मागणी करणार असून त्यासाठी ते मुंबईला रवाना झाले. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कमालीचे शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील, विधानपरिषदेचे आ. महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीसाठी दावा केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी आ. महाडिक, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. त्यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचा आपणाला पाठिंबा आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सर्वाधिक मतदान असल्याने आपण सहज निवडून येऊ शकतो. यासाठी दोघांनीही आपले नाव घ्यावे, अशी मागणी आवाडे यांनी केली. विजयाचे संख्याबळ आपल्याकडे असल्याने पुन्हा उमेदवारी मिळाल्यास आपला विजय निश्चित असल्याचे महाडिक यांनी सांगितले तर आपणही काँग्रेस श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे, त्यामुळे इतरांची शिफारस करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितल्याचे समजते. बैठकीत काहीवेळ खा. धनंजय महाडिक उपस्थित होते. सतेज पाटील सोडून तिघांपैकी कोणालाही उमेदवारी देण्याच्या प्रस्तावावर बैठकीत निर्णय झाला. (प्रतिनिधी)
‘सतेज पाटील यांना उमेदवारी देऊ नका’
By admin | Published: December 01, 2015 3:27 AM