मुंबई : महामार्ग क्रमांक ६६ वर पडलेले खड्डे आणि त्यामुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाताना वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला होता. एसटीच्या ग्रुप बुकींग केलेल्या प्रवाशांना या मार्गावरुन नेण्यासाठी एसटीचे नियोजन होते. सर्व ग्रुप बुकींग झाल्यानंतर पर्यायी मार्गासाठी प्रवाशांना विचारले असता जवळपास ८0टक्के ग्रुप बुकींगवाल्यांनी जुन्याच मार्गावरुन जाण्यास पसंती दिली आहे. तरीही जुन्या मार्गावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी पाहता एसटीकडून १ सप्टेंबरपर्यंत आढावा घेतला जाईल. गणेशोत्सवकाळात कोकणाती वाहतूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या ऐवजी पर्यायी मार्ग परिवहन विभागाकडून एसटीला सुचविण्यात आले होते. त्यानुसार एसटी महामंडळाकडून ग्रुप बुकींग झालेल्या २0५२ फेऱ्यांतील प्रवाशांना नव्या पर्यायी मार्गाने नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई ते चिपळूणपर्यंत जाणाऱ्या बसेस खोपोली, पाली मार्गे माणगाव, महाड, चिपळूणपर्यंत तर चिपळूणच्या पुढे रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या एसटी बसेसना पुणे, सातारा, उंब्रज (कुभांर्ली घाट) मार्गे जाण्याचा पर्याय देण्यात आला. मात्र या पयार्यांमुळे ग्रुप बुकींग प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागणार असल्याने अनेकांनी त्याला नापसंती दर्शविली. एसटी महामंडळाकडून त्याचा आढावा घेतानाच ज्या भागांत ग्रुप बुकींग झाली आहे त्या प्रवाशांना विचारण्यात आले असता जवळपास ८0 टक्के ग्रुप बुकींग प्रवाशांनी जुन्या मार्गाला पसंती दिली आहे. कोकणचा मार्ग बरा असून प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार नाही,असे म्हणणे अनेकांनी एसटीकडे मांडले. ३१ आॅगस्टपासून कोकणासाठी ग्रुप बुकींगच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. यात ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजीचे प्रमाण कमी असून २ सप्टेंबरपासून त्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंतही एसटीकडून आढावा घेण्यात येणार आहे.
कोकणचा नवा मार्ग नको!
By admin | Published: August 30, 2016 3:57 AM