मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी खरिपाची पेरणी करण्याइतपत पाऊस झाला नसल्याने तूर्त पेरणीची घाई करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विशेषत: विदर्भ आणि नाशिक विभागातील काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. १ ते २१ जून पर्यंत राज्यात ६५.२ मिलिमीटर इतका पाऊस पडला. गेल्यावर्षी याच काळात ९३.१ टक्के इतका पाऊस झाला होता. २६ जूनपासून दमदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्याच्या जलाशयांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १७ टक्के पाणीसाठा होता. सध्या मराठवाड्यात एक टक्का, कोकण २८ टक्के, नागपूर विभाग १६ टक्के, अमरावती विभाग १० टक्के, नाशिक ८ टक्के तर पुणे विभागात ७ टक्के जलसाठा आहे. राज्यात आजमितीस ४ हजार ९८२ गावे आणि ७ हजार ८६२ वाड्यांना ६ हजार १३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांवर ६ लाख ९० हजार मजूर कामे करीत आहेत. चाराछावण्यांच्या संख्येत घट होत आहे. बीड जिल्ह्यात एक, उस्मानाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३५, लातूरमध्ये ४, सांगलीत एक तर परभणीत एक अशा एकूण ४६ छावण्या सुरू आहेत. ही संख्या ४०० पर्यंत गेली होती. (विशेष प्रतिनिधी)
पेरणीची घाई करू नका
By admin | Published: June 22, 2016 4:10 AM