मुंबई : स्वाइन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी व संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. नागरिकांनीही असे सर्दी, ताप खोकला अंगावर न काढता तातडीने उपचार घ्यावेत. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी आरोग्य भवन येथून राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला व स्वाइन फ्ल्यूसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या राज्यातील बदलते तापमान व त्यातील फरकामुळे स्वाईन फ्ल्यूचे विषाणू पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात ६० टक्के हे शहरी भागात तर ४० टक्के ग्रामीण भागात सध्या स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये विशेषत: बाहेर गावावरून आलेल्यांचा समावेश आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यात प्रामुख्याने या विषाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.डॉ. सावंत म्हणाले की, नागपूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, बुलडाणा, लातूर आदी जिल्ह्यात पुन्हा सर्वेक्षण वाढविण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यातही मधुमेही, रक्तदाबाचा त्रास असलेले, गरोदर माता यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेस देण्यात आल्या आहेत, असेही डॉ सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ताप, सर्दी, खोकला याकडे दुर्लक्ष करू नका
By admin | Published: April 17, 2017 3:21 AM