- विशेष प्रतिनिधीअलिबाग : जैवशास्त्राच्या क्रांतीचे जसे फायदे झाले आहेत, तसेच काही नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यातून निर्माण होत आहेत. त्याची जाणीव विज्ञान साहित्यातून घडते. त्यामुळे विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता माझी निवड केली हा मी माझा नव्हे तर विज्ञान साहित्याचा बहुमान समजतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक तथा विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांनी केले आहे. अलिबागजवळच्या कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहातील डॉ. मा.ना. आचार्य साहित्य नगरीत रविवारी मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या महानगर साहित्य संमेलनाचे आयोजित केले होते. त्यावेळी डॉ.फोंडके बोलत होते.फोंडके म्हणाले की, संपूर्ण जग हे ज्ञानाधिष्ठित उद्योगसंस्कृतीकडे वळले आहे. त्यासाठी लागणारे भांडवल हे नवनिर्मितीच्या ज्ञानाचे आहे आणि असे ज्ञान विज्ञान साहित्यातून मिळते. विज्ञानाच्या आविष्कारांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैवशास्त्राने मारलेल्या मुसंडीचे परिणाम माणसाच्या ऋणानुबंधावर दिसून येत आहेत. या क्रांतीमुळे जग जरी जवळ आले असले, तरी माणसांमध्ये दुरावादेखील निर्माण झाला आहे. संपर्क माध्यमांतून माणसे भेटतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.उद्घाटनानंतर दुसºया सत्रात, डॉ.समीरण वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘समाज माध्यमे आणि वाचन संस्कृती’ या विषयावरील परिसंवादात राही पाटील, श्रीरंजन आवटे आणि आदित्य दवणे सहभागी झाले होते.दुपारच्या सत्रात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांची सुनंदा अमरापूरकर यांनी घेतलेली मुलाखत रंगली. कविसंमेलनात अप्पा ठाकूर, नामदेव कोळी, किशोर पाठक,संजय चौधरी,रमेश धनावडे आदींनी कविता सादर केल्या.
विज्ञान साहित्याकडे दुर्लक्ष करू नये! - डॉ. बाळ फोंडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:16 AM