मुंबई : प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप नको, असे बजावत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी हमी सरकारला दोन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी)कार्यकारिणीचा कालावधी मे महिन्यामध्ये संपूनही सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे एमएमसीएला उच्च न्यायालयाला याचिका दाखल करावी लागली. न्यायालयाने सरकारला फैलावर घेतल्यानंतर, सरकारने निवडणूक कार्यक्रम हाती घेतला. निवडणूक प्रक्रियेत सरकारचा नको तेवढा हस्तक्षेप उच्च न्यायालयाला खटकल्याने, उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. ‘या निवडणुकीमध्ये सरकारला एवढे स्वारस्य का? आम्हाला ते दिसून येत आहे. निवडणूक अधिकारी सचिवांकडून सूचना घेतात. ही प्रक्रिया स्वतंत्र असली पाहिजे. त्यात सरकारने जास्त ढवळाढवळ करू नये,’ अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले. सरकारने निवडणुकीची तारीख जाहीर करणारी अधिसूचना काढल्याची माहिती दिली. त्यावर खंडपीठाने मतदारांची अंतिम यादी तयार केली का? अशी विचारणा सरकारकडे केली. अद्याप अंतिम मतदार यादी तयार नाही, पण काहीच दिवसांत अंतिम यादी तयार करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिले. ‘निवडणूक प्रक्रियेतील नियम न पाळता, थेट अधिसूचना काढली कशी? आधी अंतिम मतदार यादी तयार करा,’ असे निर्देश सरकारला दिले. (प्रतिनिधी)
‘एमएमसी’च्या निवडणूक प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 2:23 AM