मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना-भाजपाने युती केली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरुन दोघांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री आमचाच अशा दोन्ही पक्षाच्या भूमिकेवरुन नेते एकमेकांविरोधी भूमिका घेत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी आमचं ठरलंय ही सावध भूमिका मांडली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यात 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र गेल्यावेळी भाजपाने जिंकलेल्या 123 जागांपैकी एकही जागा भाजपा सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे. शिवसेना-भाजपा मित्रपक्ष असले तरी गेल्या निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडल्या जाणार नाहीत. ज्या जागांवर पराभव झाला त्याठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर कोणता पक्ष असेल त्या जागा समन्वयाने एकमेकांना सोडणार आहे असं दानवेंनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्रिपदावरून थेट भाष्य न करता मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता तुम्ही करु नका. शिवसेना-भाजपात मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं आहे. ते आम्ही ते तुम्हाला सांगणार नाही असं रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत आमच्या पक्षाची तयारी आहे. अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत हीच भूमिका आहे. महिलांना सक्रीय राजकारणात आणण्यासाठी त्यांना 33 टक्के आरक्षण द्यावं अशीच भाजपाची भूमिका असल्याचं दानवेंनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात कुरघोडीचं राजकारण असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-मेळाव्यात वाघ आणि सिंह एकत्र आल्याने सत्ता कोणाची येणार हे सांगण्याची गरज नाही असं वक्तव्य केलं. मात्र विधानामधील वाघ शिवसेना तर सिंह भाजपा असल्याचं मुख्यमंत्र्यांचे म्हणणं असेल तर सिंह जंगलाचा राजा असतो त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा असेल असं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन स्पष्ट होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं काय घडतं मुख्यमंत्री कोण होतं हे काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.
सर्व २८८ जागांची तयारी ठेवा; भाजपचा आदेश