डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सहभाग घेतला पाहिजे. मुले जसे आईवडिलांचे ऐकतात, त्याचप्रमाणे आता मुलांचेही पालक ऐकू लागले आहेत. शहर स्वच्छतेसाठी ही भावी पिढी पालकांना समजवेल. याचा अर्थ मुलांच्या हाती झाडू दिला जाणार नाही. घाण करणाऱ्यांना ही मुले टोचण्याचे काम करतील, जेणेकरून अशा मंडळींवर अंकुश ठेवला जाईल. म्हणूनच, अभियानाच्या उद्घाटनासाठी मुलांना आणण्याचा आग्रह धरला, असे स्पष्टीकरण शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिले. ‘परिवर्तन’ या संकल्पनेंतर्गत स्वच्छता अभियानाचे उद््घाटन डोंबिवली जिमखाना येथील पटांगणात ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाले. या वेळी रश्मी ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपनेते डॉ. अमोल कोल्हे, सचिव आदेश बांदेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र उपस्थित होते. ठाकरे यांनी सुरतचे उदाहरण दिले. सुरतला जेव्हा प्लेगची साथ आली होती, त्या वेळी तत्कालीन आयुक्तांनी सर्व शक्ती पणाला लावत सुरत स्वच्छ तसेच प्लेगमुक्तही केले. आज जवळपास १० वर्षांनी सुरत हे स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरिक सूज्ञ आहेत. तेदेखील शहर स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करतील आणि महापालिकेला, शिवसेनेला सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहर स्वच्छतेसाठी जे आवश्यक आहे, त्या सर्वांची सोय करण्याचे आदेश महापौरांना दिले.
मुलांच्या हातात झाडू देणार नाही
By admin | Published: May 09, 2016 2:00 AM