पिंपरी : काँग्रेस पक्ष सध्या शून्य लेव्हलवर आहे. गतवैभव मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. पक्षाचे यापेक्षा अधिकचे काय नुकसान होणार? त्यामुळे कोणाचा मुलाहिजा बाळगायचा कशाला? पक्षाच्या कार्यक्रमाला जे उपस्थित नाहीत, त्यांच्या वेगळ्या हालचाली सुरू आहेत. बंडखोरीचे त्यांचे संकेत मिळू लागले आहेत. पक्षाने मोठे केलेल्यांपैकी अनेकजण पक्षावरच टीका करू लागले आहेत. अशा गद्दार आणि फितुरांना पक्षात थारा देऊ नका, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या सभागृहात शहर काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरात मार्गदर्शन करताना, त्यांनी पक्षात गटबाजी करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. हे शिबिर कोणा व्यक्तीचे नाही. पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक़्रमास जे उपस्थित नाहीत, त्यांच्या वेगळ्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांच्या बंडखोरीच्या हालचाली स्पष्ट होतील. पक्ष संघटनेत राहून ज्यांनी व्यक्तिगत फायदा लाटला, अशांना आता दूर ठेवा. पक्षाला फटका बसेल, नुकसान होईल, याची काळजी करू नका. पक्षापेक्षा कोणीही व्यक्ती मोठी नाही, हे लक्षात घ्या.’’ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘काहीजण संस्थानिक ासारखे वागले. मनधरणी करण्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.’’ प्रवक्ते रत्नाकर महाजन म्हणाले, ‘‘मला कळवले नाही, फोन आला नाही, अशी कारणे सांगणाऱ्यांच्या मनात काय सुरू आहे, हे लक्षात येते. सचिन साठे शहराध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ दूर झाली.’’ शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, ‘‘पक्षवाढीला वाव आहे; परंतु येणाऱ्याचे स्वागत करण्याऐवजी त्याला भीती घातली जात होती.’’ (प्रतिनिधी)
गद्दार, फितुरांना पक्षात थारा देऊ नका
By admin | Published: June 28, 2016 1:46 AM