- स्नेहा मोरे दैनंदिन आयुष्यातील सोशल मीडियाच्या अतिवापराविषयी वेळोवेळी चर्चा होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या वेणा तलावात ‘फेसबुक लाइव्ह’ करताना बोट उलटून झालेला अपघात हेसुद्धा याचेच एक उदाहरण. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबतच्या क्षणांना ‘आठवणी’त साठविण्याऐवजी, सोशल मीडियावर ‘शेअर’ करण्यावर दिली जाणारी भर जीवघेणी ठरत असल्याची अनेक उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचे व्यसन वेळीच नियंत्रणात आणले पाहिजे.पूर्वी केवळ टाइमपास म्हणून सोशल मीडिया वापरणारे नेटिझन्स आता मात्र, रात्रंदिवस या आभासी जगात जगताना दिसताहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकने नव्याने लाइव्ह आॅप्शन उपलब्ध करून दिले. यामुळे तुमच्या समारंभाचे किंवा तुम्ही असलेल्या ठिकाणचे व्हिडीओ चित्रीकरण करून, ते थेट तुमच्या ‘फ्रेंड लिस्ट’मधील मित्रांसोबत लाइव्ह पद्धतीने शेअर करण्याची व्यवस्थाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे आता या व्हर्च्युअल जगाला खऱ्याखुऱ्या जगण्याएवढे किंबहुना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे.नागपुरातील वेणा तलावातील दुर्घटनेमुळे एका क्षणात जिवाभावाच्या मित्रांना गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्यापैकी ज्या मित्रांचा जीव वाचला, त्यांना आता पश्चात्ताप होत आहे. मात्र, वेळ निघून गेल्यावर चुकचुकण्यापेक्षा या अनुभवातून धडा शिकून शहाणपण शिकले पाहिजे. फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरील पोस्टला लाइक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना, घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.तंत्रज्ञान हे चांगलेच असते, पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला, तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला, तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता, कधी-कधी लोकांच्या भावना भडकविण्यासाठीही केला जातो, याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना, लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र, असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, विधायक घटनांच्या बाबत शेअरिंग करणे होय. याविषयी मानसोपरचारतज्ज्ञ डॉ. रोहिणी दास यांनी सांगितले की, सातत्याने सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापराविषयी चर्चा होते. आता मात्र, या प्रकारांमुळे ‘सोशल मीडिया फ्री डे’ सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे. नेटिझन्सच्या मानसिकतेला त्यांच्याच जीवनशैलीनुसार उत्तर दिले पाहिजे. म्हणजे सुरुवातीला एक दिवसापासून हे समीकरण सुरू करायचे, त्यात संपूर्ण दिवसभर सोशल साइट्सपासून अलिप्त राहून आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यासोबत वेळ घालवून तो आठवणींत साठवून ठेवायचा. घरातील लहानग्यांनाही ही सवय आतापासून लावली पाहिजे. जेणेकरून, त्यांचे भविष्य ‘व्हर्च्युअल’ स्क्रीन्सपुरते मर्यादित राहणार नाही.
‘लाइव्ह’ नको; जिवंतपणे जगा!
By admin | Published: July 16, 2017 12:19 AM