पुणे : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांना बॅँकांकडून अर्थसाह्य होत असल्याने अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना ‘पीएमआरडीए’ने शहर व जिल्ह्यातील सर्व बॅँकांना दिल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील सर्वच अनधिकृत बांधकामांबाबत सर्व बॅँकांना कळवले आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. याला लगाम घालणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने पावले उचलली आहेत. पीएमआरडीएने याचाच एक भाग म्हणून बॅँकांसोबत मंगळवारी बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद पाठक, जिल्हा अग्रणी बॅँक व्यवस्थापकांसह राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँकांचे १५ प्रतिनिधी उपस्थित होते. बांधकाम नकाशावर ग्रामपंचायतींचे शिक्के मारून संबंधित बांधकामाला मंजुरी असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना बांधकाम मंजुरीचे अधिकार नाहीत. त्यामुळे बांधकामांना ग्रामपंचायतींची परवानगी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणुकीचे होत आहे. जिल्ह्यातील १४०९ पैकी ८४२ ग्रामपंचायतींचा पीएमआरडीएमध्ये समावेश होतो. या कार्यक्षेत्रात गावठाणाबाहेरील सर्व क्षेत्र हे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहे. ग्रामपंचायत गावठाणाबाहेरील क्षेत्रांमध्ये बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार पीएमआरडीएला आहेत. कोणत्याही बांधकामास ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. पण, तसे दाखवून व्यवहार केला जातो. यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते. ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी दाखवून बॅँकाही अशा बांधकामांना सहजपणे कर्ज देतात. ......ग्रामपंचायतीने मंजूर केले तरी कर्ज देऊ नका...मंजुरी देताना बॅँकांनी संबंधित बांधकामाला पीएमआरडीएची मंजुरी आहे का, हे तपासून घ्यावे. बांधकाम नकाशाची प्रत तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करावी. बांधकामाला पीएमआरडीएची मान्यता असेल तरच कर्ज मंजूर करावे, अशी सूचना बॅँकांना दिलेली आहे. गावठाण हद्दीबाहेरील बांधकामांच्या नकाशावर ग्रामपंचायतीचे मंजुरीचे शिक्के असतील, तर अशा बांधकामांना कर्ज देऊ नये, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचनाही अधिकाºयांनी दिल्या आहेत. कर्ज मंजूर करताना कोणती कागदपत्रे मागावीत, कोणती आवश्यक आहेत, याचे नियम आहेत. याचे पालन बॅँकांनी करावे, असेही सांगण्यात आले.
अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका : 'पीएमआरडीए'ची सर्व बॅँकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:20 PM