औरंगाबाद : ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त न पाहता संपूर्ण मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शनिवारी सकाळपासून काँग्रेसतर्फे दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा झाली व दुष्काळाची माहिती घेण्यात आली.
मराठवाड्यात ७६ पैकी ५६ तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, उडीद ही पिके वाया गेली आहेत. पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतीचा व्यवसाय कोलमडणार आहे. रब्बीचा हंगामसुद्धा धोक्यात आला आहे. मराठवाड्यातील तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक काढण्यात आलेली आहे. आता या जिल्ह्यांना काहीच सवलती मिळणार नाहीत, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली.‘या’ राज्यांकडे जातो कोळसाकोळशाचे नीट नियोजन केले नसल्याने राज्यात विजेचे भारनियमन करण्याची वेळ आलेली आहे. निवडणुका जाहीर झालेल्या राज्यांमध्ये कोळसा वळविण्यात येत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. लवकरच जल आराखडा जाहीर होईल. त्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी निर्देशित करण्यात आले पाहिजे. या संदर्भात मी शासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे, असेही चव्हाण म्हणाले.