लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एखाद्या लहान-मोठ्या प्रश्नावरून कुठे काही मतभेद झाला तर लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे, असा अर्थ होत नाही. गोंदिया-भंडाऱ्यात जे घडले तो स्थानिक प्रश्न आहे. त्याला राज्यस्तराचा बनवू नये, असा सल्ला मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. आपला शत्रू कोण हे त्यांनी ओळखले पाहिजे, अशी भावना गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कार्यालयात माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, गोंदिया-भंडाऱ्यात जे घडले ते स्थानिक पातळीवर घडले. याबाबत पटोले यांनी त्यांच्या पक्षनेत्यांकडे तक्रार केली असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल निर्णय घेतील. मात्र, त्यांनी स्थानिक प्रश्न राज्यस्तरावरचा करण्याची गरज नव्हती. तसेच राज्यात विविध आंदोलनांवरून केवळ भाजपच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करताना गृहमंत्री म्हणाले की, पोलीस आयुक्त याबाबत निर्णय घेतील. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी आढळले तर त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सभेला परवानगी नाकारण्याचे कारण नाही
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचा कुठलाच विषय नाही. रीतसर परवानगी मागितली तर पुण्यातील सभेला परवानगी दिली जाईल, असेही वळसे- पाटील यांनी स्पष्ट केले. सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच्या विकृत पोस्टचे समर्थन केले होते, त्याबाबत ते म्हणाले की, सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका आता बदलली आहे. सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकल्यानंतर वादंग निर्माण होत असल्यामुळे त्यावर बंधने आणावीत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर बंधने आणता कामा नये. सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी संयम ठेवायला हवा किंवा सोशल मीडिया रेग्युलेट करण्यासाठी काही धोरणे किंवा कायदे ठरवले गेले पाहिजे. त्यादृष्टीने विचार करायला हवा, मात्र, हे रेग्युलेशन म्हणजे निर्बंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.