मुंबई : काश्मिरात आपल्या जवानांची मुंडकी उडवली जात असताना नरेंद्र मोदी ‘मन की बात’ करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी मन की नव्हे, तर गन की बात करून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसून दोन जवानांचा शिरच्छेद केल्याच्या मुद्द्यावरून वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात उद्धव यांनी पंतप्रधान मोदी व भाजपाला लक्ष्य केले. ते म्हणाले, मी काहीही बोललो तर सरकारच्या विरोधात आहे, असे म्हटले जाते. पण, काश्मीर जळत असताना आणि आपल्या सैन्यांवर हल्ले होत असताना पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये व्यस्त आहेत. मुंबईच्या विकासावरही उद्धव यांनी भाजपाला टोले लगावले. विकास आराखड्यात जर भूमिपुत्रांना न्याय मिळणार नसेल तर त्याला विरोध करणारच. पुनर्विकासाच्या नावाने मराठी माणसांना बाहेर फेकले जाते. सोयीने विकास आराखडा बनवायचा व पास करून घ्यायचा हे चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. (विशेष प्रतिनिधी)
मन की नव्हे, गन की बात करा - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 03, 2017 4:13 AM