बारामती : विविध संशोधन क्रांतीतून मानवाच्या पलीकडे विश्व निर्माण होण्याची आगामी काळात शक्यता आहे. जैविक क्रांतीसह निर्माण झालेल्या अनेक बदलातून संपूर्ण जग नाहीसे होण्याचीदेखील शक्यता आहे. जगात वाढणारी आर्थिक, सामाजिक विषमता दुर्लक्षित करून चालणार नाही, असे मत विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली. शारदानगर येथे अप्पासाहेब पवार सभागृहात सुधीर गाडगीळ यांनी वासलेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी २५ वर्षांत जगात दहशतवाद हे मोठे आव्हान ठरणार आहे. याबाबत जगभरातील तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केले आहेत. पाण्यामुळे पुढील काळात आंतरराष्ट्रीय युद्धजन्य स्थिती येऊ शकते. सर्वत्र आमूलाग्र बदल होत आहेत. चौथी औद्योगिक क्रांती येऊ पाहत आहे. पृथ्वीच्या इतिहासात अब्जावधी वर्षांमध्ये प्रथमच जिवाची निर्मिती प्रयोग शाळेत करण्यात काही वर्षांपूर्वी यश आले. ते म्हणाले, ‘‘सध्या सर्वत्र मानवानंतरचे विश्व या विषयावर चर्चा होत आहे. मानवाच्या पलीकडे विश्व निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम होण्याचे संकेत आहेत. अन्न, पाण्याचा तुटवडा, कर्करोगावरील उपचार यातून पुढे येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला एकदा क्रूरकर्मा संपूर्ण जग नाहीसे करण्याची शक्यता आहे. जगातील युनो कौन्सिलच्या सुरक्षा मंडळात पाणी या विषयावर आधारित संशोधन मांडण्यात आले आहे. त्याला प्रगतिशील देशांकडून पाठिंबा मिळत आहे. तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन चाकांवर जगाचे भवितव्य आहे. संशोधनावर आधारित समाजनिर्मितीसाठी वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे. शैक्षणिक बदल, शैक्षणिक क्रांतीद्वारे हे शक्य होईल. ज्ञान, संशोधन आणि शाश्वत मूल्यावर आधारित भारतीय समाज पुढे जाईल, याचा विचार करण्याची गरज वासलेकर यांनी शेवटी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बारामतीचा नियोजनबद्ध विकास कौतुकास्पदबारामती शहराचा नियोजनबद्ध विकास हा कौतुकास्पद आहे. येथील कृषी क्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करणारे आहेत. शरद पवार यांनी बारामतीचा केलेल्या नियोजनबद्ध विकासाचे परिणाम आज पहावयास मिळत असल्याची पावती वासलेकर यांनी दिली.
आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष नको
By admin | Published: May 16, 2016 12:47 AM