मुंबई : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा हे महापालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून येत असून, त्याचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम व गुरुदास कामत यांच्या भांडणाशी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय सावंत यांनी सांगितले, तर खुलेआम मतभेद जाहीर करू नका, अशी तंबी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी सोमवारी टिष्ट्वट करून काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यावर आरोप केले होते. शिवाय, या टिष्ट्वटमुळे पक्षश्रेष्ठींनी भूपेंद्रसिंग हुडा यांना पाठवले असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रवक्ते असलेले सावंत यांनी कामत यांचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, कामत आणि निरुपम यांच्यातील वाद सोमवारी समोर आला, ते कामत यांनी टिष्ट्वट केल्यामुळे, पण त्याच्या आधीच दोन दिवसांपूर्वी हुडा यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात येत असल्याचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पाठवले होते. ते २४ तारखेला सायंकाळी येणार आणि त्या दिवशी सकाळपासून राज्य प्रदेश कमिटीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरू होणार हे आधीच ठरले होते.प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एआयसीसी केंद्रातून निरीक्षक पाठवत असते. २०१२ साली पक्षाने भरतसिंह सोळंकी यांना निरीक्षक म्हणून पाठवले होते, या वेळी हुडा यांना पाठवले आहे, असेही सावंत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
खुलेआम मतभेद जाहीर करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 3:00 AM